Join us

मुंबईतील 140 वर्ष जुनं परळ वर्कशॉप बंद करण्याचा रेल्वेचा घाट?; मनसेने केला विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 10:38 AM

एकीकडे सरकार मेक इन इंडिया सारख्या उपक्रमांना चालना देतं तर दुसरीकडे गौरवाशाली इतिहास असणारा परळचा रेल्वे कारखाना बंद करण्याचं स्वप्न पाहतं

 मुंबई - मध्य रेल्वेवरील 140 वर्ष जुने परळ वर्कशॉप बंद करण्याचा घाट रेल्वे प्रशासनाने घातला आहे. सोमवारी मध्य रेल्वे प्रशासनाने परळ वर्कशॉपमधील 715 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बडनेरा येथे तात्पुरत्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संतप्त भावना निर्माण झालेल्या आहेत. 

रेल्वे कर्मचाऱ्यांनी सांगितले की, एकेकाळी परळ वर्कशॉपमध्ये हजारो कर्मचारी काम करत होते. सध्या याठिकाणी जे काम करत आहेत त्यांच्याही बदल्या करण्यात येत आहे. अलीकडेच रेल्वेने या वर्कशॉपमधील 715 अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या बडनेरा येथे केल्या. रेल्वेचं 140 वर्ष जुने वर्कशॉप बंद करण्याचा रेल्वे प्रशासनाचा डाव असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे. रेल्वेतील एका जाणकाराच्या मते, रेल्वे प्रशासन गेल्या अनेक वर्षापासून हे वर्कशॉप बंद करण्याच्या प्रयत्नात आहे. याठिकाणी कधी टर्मिनस होईल अथवा नवीन रेल्वे रुळ टाकले जातील असं बोललं जातं. मात्र मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या परळ वर्कशॉपच्या जागेची किंमत कोट्यावधीच्या घरात आहे. त्यामुळे परळ वर्कशॉप बंद करण्यामागे काही षडयंत्र आहेत का असा संशय व्यक्त केला जातो.

एकीकडे सरकार मेक इन इंडिया सारख्या उपक्रमांना चालना देतं तर दुसरीकडे गौरवाशाली इतिहास असणारा परळचा रेल्वे कारखाना बंद करण्याचं स्वप्न पाहतं. रेल्वे प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या केलेल्या बदल्या चुकीच्या आहेत असं सांगत रेल्वे कर्मचारी संघटनांनी प्रशासनाचा विरोध केलेला आहे. हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. 

मनसेच्या रेल्वे कर्मचारी संघटनेने प्रशासनाच्या या निर्णयाचा निषेध केलेला आहे. १४० वर्षाचा वैभवशाली इतिहास असणारा मुंबईच्या परळ येथील भारतीय रेल्वेचा डीझल लोको कारखाना बंद करण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे. त्याविरोधात सर्व कामगार संघटना व कामगार एकत्रित लढा देत आहेत. ह्या लढाईत परळ कारखाना वाचविण्यासाठी कामगारांसोबत नेहमीच मनसे सोबत असू असे प्रतिपादन मनसे रेल्वे कर्मचारी सेनेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील केलं आहे.  

टॅग्स :रेल्वेमनसे