Join us

१४०० कार, ४५० बस बिनधास्त करा पार्क; दहिसर येथील पार्किंग हबसाठी निविदा प्रक्रिया सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 6:28 AM

या वाहनांनाही थेट शहरात न येता पार्किंग हबच्या ठिकाणीच थांबावे,  अशी हब उभारण्यामागची संकल्पना आहे.

मुंबई - मुंबई आणि वाहतूककोंडी यांचे घट्ट नाते आहे. या नकोशा नात्यावर उपाय शोधण्यासाठी शहराच्या प्रवेशद्वारावर पार्किंग हब उभारण्याचा प्रस्ताव होता. त्या दृष्टीने मुंबई महापालिकेने मानखुर्द आणि दहिसर येथील जकात नाक्याची जागा हेरली होती. त्यापैकी दहिसर येथे पार्किंग हब आणि व्यावसायिक केंद्र उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असून, त्यासंदर्भातील निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. येत्या साडेतीन वर्षांत हे हब उभारले जाणार असून येथे १४०० कार आणि ४५० बस पार्क करता येणार आहेत. 

मुंबईत दररोज शेकडो प्रवासी वाहने येत असतात. त्याच पटीने शहराबाहेरही जात असतात. परिणामी अनेक ठिकाणी वाहतूककोंडी होते. ही समस्या दूर करण्यासाठी पार्किंग हब बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबईत पूर्वी पाच जकात नाके होते. २०१७ साली  जकात नाके बंद करण्यात आल्यानंतर तेथील जागा मोकळ्या आहेत. त्यापैकी मानखुर्द आणि दहिसर जकात नाक्याच्या जागेवर पार्किंग हब प्रस्तावित होते. गुजरात, राजस्थान तसेच उत्तर भारतातून येणारी वाहने  दहिसर येथून मुंबईत प्रवेश करतात. तर पश्चिम महाराष्ट्र, कोकण  तसेच देशाच्या अन्य भागातील वाहने मानखुर्द-वाशी मार्गे मुंबईत येतात. 

या वाहनांनाही थेट शहरात न येता पार्किंग हबच्या ठिकाणीच थांबावे,  अशी हब उभारण्यामागची संकल्पना आहे. या वाहनांमधून येणाऱ्या प्रवाशांना  शहराच्या अन्य भागात  जाण्यासाठी मेट्रो, तसेच अन्य सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची कनेक्टिव्हिटी दिली जाईल. दहिसर येथील हब पश्चिम द्रूतगती महामार्गावर असेल. हबला मेट्रो ९ आणि १० च्या  पांडुरंगवाडी स्थानकाजवळ कनेक्टिव्हिटी मिळेल. प्रवाशांसाठी मिनी बस उपलब्ध करून दिल्या जातील.

टॅग्स :पार्किंग