मुंबई: पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात काम करणाऱ्या सफाई कामगारांच्या वसाहतींचा आश्रेय योजनेअंतर्गत पुनर्विकास सुरु आहे. त्यानुसार या कर्मचाऱ्यांना १४ हजार रुपये विस्थापन भत्ता देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. भाड्याच्या घरात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना १४ हजार रुपयांबरोबरच पगारानुसार घरभाडे भत्ता दिला जाणार आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी मंजुरी मिळाली.
सफाई कामगारांच्या ३९ वसाहतींचा पुनर्विकास महापालिका करणार आहे. त्यानुसार काही इमारतींच्या कामांना मंजुरी मिळाली असून पुनर्विकास होईपर्यंत सफाई कामगारांना संक्रमण शिबिरात जागा दिली जाणार आहे. यासाठी २१० कोटी रुपये खर्च करुन नऊ ठिकाणी संक्रमण शिबीर बांधण्यात येणार आहेत. परंतु, सध्याच्या निवासस्थापासून अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास सफाई कामगार तयार नाहीत. इमारतीचे पुनर्विकास आणि संक्रमण शिबीराचे बांधकामही रखडले आहे. ही अडचण दूर करण्यासाठी पालिकेने चेंबूर येथे स्थालांतरीत होणाऱ्या सफाई कामगारांना १४ हजार रुपये विस्थापन भत्ता देण्याची तयारी दाखवली आहे. तर चेंबूर येथे स्थलांतरित न राहता भाड्याच्या घरात राहण्यास तयार असणाऱ्या कर्मचाऱ्यांना १४ हजार रुपये विस्थापन भत्यासह वेतनाच्या प्रमाणात घरभाडे दिले जाणार आहे.
अन्यथा ७५ हजार रुपयांची उचल-
या पुनर्विकासात कामगारांना परतफेडीच्या स्वरुपात ७५ हजार रुपये उचल कामगारांना मिळणार आहे. ही उलच विस्थापन भत्त्यातून दर महिन्याला पाच हजार रुपये या प्रमाणे कापण्यात येईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. मात्र स्वत: भाडयाच्या घरात राहणाऱ्या कामगारांना दर महिन्याच्या १५ तारखेला विस्थापन भत्ता दिला जाईल. मात्र सदर कामगार वास्तव्यास असलेली इमारत १०० टक्के रिकामी होत नाही, तोपर्यंत त्या कामगाराला विस्थापन भत्ता व घरभाडे भत्ता मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. पालिकेच्या २९ हजार ६१८ सफाई कामगारांना सेवा निवासस्थाने देण्यासाठी ३९ वसाहतींचा पुनर्विकास केला जाणार आहे. त्यानुसार कामगारांना किमान ३०० चौरस फुटांची जागा मिळणार आहे.