मुंबई : गेल्या काही वर्षांत स्त्रियांची नसबंदी आणि पुरुषाची नसबंदी यामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली असली तरी कुटुंब नियोजनाच्या या कार्यक्रमाला हवे तसे यश प्राप्त झालेले नाही. हा कायम स्वरूपाचा संतती प्रतिबंधक उपाय आहे. विशेष म्हणजे नसबंदी विषयात पुरुषांपेक्षा महिला अनेक पटीने पुढे असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून दिसून आले आहे. आजही या विषयाला घेऊन महिला आणि पुरुष दोघांमध्ये मोठे गैरसमज असल्याचे दिसून येते. याकरिता मोठ्या प्रमाणात जनजागृतीची गरज असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
अंतरा गर्भनिरोधक, कॉपर-टीचा पर्याय
२०२२ ते २०२३ या कालावधीत मुंबई महापालिकेच्या विविध रुग्णालयांत एकूण १४ हजार ५०९ पेक्षा अधिक नसबंदी झाल्या. त्यात १४ हजार २९ महिला आणि ४८० पुरुषांचा समावेश आहे. हजार ८९५ महिलांनी अंतरा या गर्भनिरोधक इंजेक्शनसाठी निवड केली. ३९ हजार ४७७ महिलांनी कॉपर- टीचा पर्याय निवडला. या कालावधीत १४ हजार ५८१ गर्भनिरोधक गोळ्यांचेही वाटप करण्यात आले. गेल्या वर्षीच्या तुलनेत पुरुष नसबंदीची संख्या व अंतरा आणि छाया या तात्पुरत्या गर्भनिरोधक पद्धतीचा अवलंब करणायांची संख्या वाढली असल्याची माहिती देण्यात आली आहे.
आमच्या कुटुंब नियोजन विभागातर्फे महिला आणि पुरुष नसबंदीबाबत जनजागृती मोहीम घेत असतो. प्रत्येक प्रसूतिगृहात महिलांना या नसबंदीबाबत समुपदेशन केले जाते. विशेष म्हणजे त्यांना या शस्त्रक्रियांबद्दल व्यवस्थित माहिती दिली जाते. काही गैरसमज असतील तर योग्य समुपदेशन केले जाते. त्याचप्रमाणे महिलांसाठी कायमस्वरूपी नसबंदीसोबत अंतरा इंजेक्शन आणि छाया गोळ्या या प्रतिबंधक उपायांबद्दलही सांगितले जाते. पुरुष आणि महिला नसबंदीच्या तुलनेत महिला मोठ्या प्रमाणात नसबंदीसाठी पुढे येतात. - डॉ. दक्षा शाह, कार्यकारी आरोग्य अधिकारी, मुंबई पालिका