लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लॉकडाऊन टाळायचे असेल तर मास्क लावा आणि गर्दी टाळा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. त्यानंतरही मुंबईत लग्न संभारंभ, हॉटेल, पबमध्ये लोकांची गर्दी होत आहे. त्या ठिकाणी नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे महापालिकेला आढळून येत आहे. अशी हयगय करून स्वतःसह अन्य मुंबईकरांचा जीवही धोक्यात घालणाऱ्या १४१०० लोकांना रविवारी दंड ठोठाविण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या या लोकांकडून २८ लाख २० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
मुंबईत १ फेब्रुवारीपासून लोकल सेवा ठरवीक वेळेत सर्वांसाठी सुरू करण्यात आली. मात्र यामुळे रेल्वेस्थानक व गाड्यांमध्ये गर्दी वाढली आहे. त्यामुळे बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लोकांनी तोंडाला मास्क लावणे अनिवार्य आहे. तरीही अनेक ठिकाणी लोक मास्क लावत नसल्याचे दिसून येत आहे. अशा लोकांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेने फौज उभी केली आहे. तसेच मार्शल, शिक्षक, पोलिसांनाही कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत.
विनामास्क फिरणाऱ्या दररोज २५ हजार लोकांना दंड करण्याचे लक्ष्य पालिका प्रशासनाने अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार ४८ हजार मार्शल्स मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी, बाजारपेठ, रेल्वेस्थानक येथे लक्ष ठेवून आहेत. रविवारी जुहू चौपाटी येथे लोकांची प्रचंड गर्दी झाली होती. अशीच गर्दी मुंबईतील अनेक भागांमध्ये दिसून आली. यापैकी विनामास्क फिरणाऱ्या १४ हजार १०० लोकांवर रविवारी कारवाई करून २८ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. एप्रिल २०२० ते २१ फेब्रुवारी २०२२ पर्यंत १६ लाख दोन हजार ५३६ लोकांवर कारवाई करीत ३२ कोटी ४१ लाख १४ हजार ८०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
.......................