मुंबई : मुंबईतील घरांच्या विक्रीचा आलेख उंचावत असून एप्रिल महिन्यात मुंबईतील मालमत्ता विक्रीने १४ हजार १४९ चा उच्चांक गाठला आहे. यापोटी राज्य सरकारला एकूण १०४३ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.
विशेष म्हणजे, ज्यांचे वय २८ ते ४३ या दरम्यान आहे, अशा लोकांचे मालमत्ता खरेदीतील प्रमाण हे ३७ टक्के आहे. घराची खरेदी करणाऱ्या ग्राहकाचे वय कमी होत असल्याचेही या निमित्ताने दिसून आले आहे. तर, दुसरी वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी की, चालू वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत ज्या घरांची किंमत चार कोटी किंवा त्यापेक्षा अधिक आहे अशा तब्बल १३०० कोटी घरांची विक्री झाली आहे.
बांधकाम क्षेत्राचा अभ्यास करणाऱ्या नाईट फ्रँक कंपनीने प्रसिद्ध केलेल्या या मासिक अहवालानुसार, यंदाच्या एप्रिल महिन्यात झालेली मालमत्ता विक्री ही गेल्यावर्षीच्या एप्रिल महिन्याच्या तुलनेत ९ टक्के अधिक आहे. गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात ११ हजार ५१४ मालमत्तांची विक्री झाली होती. तर, त्यावर्षी एप्रिल महिन्यात राज्य सरकारला ९०० कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. त्यात देखील वाढ नोंदली गेली आहे.