१४४ गावपाड्यांमध्ये अद्याप पाणीटंचाई
By admin | Published: June 13, 2015 11:04 PM2015-06-13T23:04:22+5:302015-06-13T23:04:22+5:30
ठाणे जिल्ह्यातील १४४ गावपाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाईला ग्रामस्थांना तोंड द्यावे लागत असून त्यांना २३ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
ठाणे : जिल्ह्यात कमीअधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. यामुळे पाणीसमस्या सुटेल, अशी अपेक्षा होती. मात्र, शुक्रवारपर्यंत ठाणे जिल्ह्यातील १४४ गावपाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाईला ग्रामस्थांना तोंड द्यावे लागत असून त्यांना २३ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
जिल्ह्यातील सात तालुक्यांपैकी ग्रामीण भागाच्या शहापूर व मुरबाड या दोन तालुक्यांमध्ये १४४ गावपाडे पाणीसमस्येला तोंड देत आहेत. यामध्ये ३९ गावांसह १०५ आदिवासी पाड्यांचा समावेश आहे. यापैकी शहापूर तालुक्यातील २३ गावे व ८० पाडे तीव्र पाणीटंचाईने त्रस्त आहेत. मुंबई व ठाणे या महानगरांना पाणीपुरवठा करणारा धरणांचा तालुका म्हणून शहापूरची ओळख आहे. पण, जिल्ह्यातील सर्वाधिक पाणीटंचाई याच तालुक्यात आहे. तेथील टंचाईग्रस्त १०३ गावपाड्यांना १६ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.याप्रमाणेच मुरबाड तालुक्यातील १६ गावे आणि २५ पाडे तीव्र पाणीटंचाईग्रस्त आहेत. या ४१ गावपाड्यांमधील ग्रामस्थांना सात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.