लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातील शिंदेसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव आणि त्यांच्या पतीविरोधात आयकर विभागाने १४५ कोटी रुपयांच्या कर थकबाकीची नोटीस जारी केली आहे. या नोटिसीविरोधात जाधव दाम्पत्याने आयकर न्यायाधीकरणात अपील केले असून, त्यांच्या याचिकेवरील निर्णय प्रलंबित आहे.
यामिनी जाधव यांनी लोकसभेचा अर्ज भरतेवेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांना लागू असलेल्या कर दायित्वाची (लाएब्लिटी) माहिती नमूद केली आहे. कर दायित्वाचे हे प्रकरण २०१८ ते २०२२ या चार वर्षांच्या कालावधीमधील आहे. जाधव यांनी दि. ११ एप्रिल रोजी आयकर न्यायाधीकरणाकडे एकूण तीन अपील दाखल केली आहेत. २०१८-१९ या आर्थिक वर्षाकरिता १ कोटी ६५ लाख रुपयांच्या करदायित्वाविराधोत मुख्य आयकर आयुक्तांकडे अपिल केले आहे, तर २०१९-२० या आर्थिक वर्षाकरिता १ कोटी २० लाखांच्या करदायित्वाविराधोत अपिल दाखल केले असून, आणखी एक अपील चार लाख रुपयांच्या करदायित्वाविराधोत आहे. यामिनी जाधव यांचे पती मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांनादेखील कर भरण्याची नोटीस आयकर विभागाने जारी केली आहे. त्यांनीदेखील आयकर विभागाच्या निर्णयाविरोधात आयकर न्यायाधीकरणाकडे एकूण चार अपील दाखल केली आहेत. यापैकी २०१८-१९ यावर्षांकरिता एकूण ७५ कोटी ४० रुपयांच्या करदायित्वाविराधोत पहिले अपिल केले आहे. दुसरे अपिल २०१९-२० या आर्थिक वर्षाकरिता ४० कोटी ४० लाख रुपयांच्या करदायित्वाविराधोत केले आहे.
तिसरे अपील २०२०-२१ या आर्थिक वर्षाकरिता ५ कोटी ६० लाख रुपयांच्या करदायित्वाविराधोत आहे तर, चौथे अपील १८ कोटी ६० लाख रुपयांच्या करदायित्वाविराधोत दाखल केले आहे. दि. १० एप्रिल २०२४ रोजी ही अपील त्यांनी दाखल केल्याची माहिती आहे.
विशेष म्हणजे, यामिनी जाधव यांनी विधानसभा निवडणुकीत जे प्रतिज्ञापत्र दाखल केले होते त्यात चुकीची माहिती दिल्याचा मुद्दा उपस्थित करत तीन वर्षांपूर्वी आयकर विभागाने निवडणूक आयोगाशी संपर्क साधत त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र, त्यावेळी कोणतीही कारवाई झाली नव्हती. जाधव दाम्पत्याची यापूर्वी आयकर विभाग, कंपनी रजिस्ट्रार तसेच ईडीने चौकशी केली आहे. या चौकशी सुरू असताना या दाम्पत्याने शिंदेसेनेमध्ये प्रवेश केला.