१४६ वर्षांपूर्वीचे ‘समर्थ’ ग्रंथ स्वामी भक्तांच्या ओंजळीत...!

By Admin | Published: April 27, 2017 12:07 AM2017-04-27T00:07:23+5:302017-04-27T00:07:23+5:30

अक्कलकोटनिवासी श्रीस्वामी समर्थ महाराज यांचे चरित्र सांगणारे, परंतु काळाच्या ओघात विस्मृतीत गेलेले तब्बल १४६ वर्षे जुने आणि दुर्मीळ ग्रंथ

146 years ago 'Samarth' written by Swami devotees! | १४६ वर्षांपूर्वीचे ‘समर्थ’ ग्रंथ स्वामी भक्तांच्या ओंजळीत...!

१४६ वर्षांपूर्वीचे ‘समर्थ’ ग्रंथ स्वामी भक्तांच्या ओंजळीत...!

googlenewsNext

राज चिंचणकर / मुंबई
अक्कलकोटनिवासी श्रीस्वामी समर्थ महाराज यांचे चरित्र सांगणारे, परंतु काळाच्या ओघात विस्मृतीत गेलेले तब्बल १४६ वर्षे जुने आणि दुर्मीळ ग्रंथ आता श्री स्वामी भक्तांच्या ओंजळीत आले आहेत. ‘श्रीपादभूषण’ आणि ‘श्रीअक्कलकोटस्थ स्वामीचरित्र’ अशी या ग्रंथांची नावे आहेत. स्वामीभक्त लेखक व संपादक विवेक दिगंबर वैद्य यांच्या संशोधनपर कार्यातून या स्वामी संचिताची निर्मिती झाली आहे. विशेष म्हणजे, मराठीसह इंग्रजी भाषेतही हे संचित मांडण्यात आले आहे.
‘श्रीपादभूषण’ हा ग्रंथ १८७१ मध्ये लिहिला गेलेला श्रीस्वामी समर्थ महाराजांवरील सर्वांत पहिला ओवीबद्ध ग्रंथ आहे. या ग्रंथात १० अध्याय आणि ५५० ओव्या आहेत. श्रीस्वामी समर्थांच्या मंगळवेढा, पंढरपूर व अक्कलकोट येथील ४० वर्षांच्या वास्तव्याचा कालखंड यात वर्णन करण्यात आला आहे. या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे, ज्या काळात महाराजांना ‘श्रीस्वामी समर्थ’ ही सर्वमान्य नाममुद्रा प्राप्त झाली नव्हती, त्या कालखंडात हा ग्रंथ लिहिला गेला आहे. या ग्रंथ संचिताच्या माध्यमातून या ग्रंथाचे मूळ लेखक सखाराम बाळकृष्ण सरनाईक यांच्याविषयीची समग्र माहिती प्रथमच श्रीस्वामी संप्रदायासमोर आली आहे.
‘अक्कलकोटस्थ स्वामीचरित्र’ हा मूळ ग्रंथ १८७२ मध्ये लिहिला गेला असून, श्रीस्वामी समर्थ महाराजांवरील हा सर्वांत पहिला संस्कृत भाषेतील ग्रंथ आहे. माधवाचार्य मैसलगीकर लिखित या ग्रंथाचे चार अध्याय आहेत. त्यास जनार्दनपंत सोनगडकरकृत मराठी प्राकृतीकरणाचीही जोड देण्यात आली आहे.
या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे, धुळे येथील इतिहासाचार्य वि. का. राजवाडे संशोधन मंडळाने ‘अक्कलकोटस्थ स्वामीचरित्र’ ग्रंथाची १८७२ मध्ये प्रकाशित झालेली प्रत, या नव्या विस्तारित आवृत्तीसाठी उपलब्ध करून दिली आहे.
या दोन्ही ग्रंथांच्या नव्या आवृत्तीचे संपादन विवेक दिगंबर वैद्य यांनी केले आहे. नव्या आणि विस्तारित आवृत्तीच्या निमित्ताने हे दोन्ही ग्रंथ ‘पुनर्वसु प्रकाशन’तर्फे तब्बल १४६ वर्षांनंतर सार्थ व सटीप स्वरूपात, तसेच मराठी आणि इंग्रजी अनुवादासह श्रीस्वामी भक्तांना प्रसादरूपी मार्गदर्शन करण्यास ‘समर्थ’ आहेत.

Web Title: 146 years ago 'Samarth' written by Swami devotees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.