Join us

मुंबई-गोवा महामार्गावर 147 होमगार्ड ठेवणार नजर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2022 11:40 AM

तीन महिन्यांसाठी राहणार कार्यरत

लोकमत न्यूज नेटवर्कमहाड :  मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे  चौपदरीकरण सुरू असून, अनेक ठिकाणी कामे अर्धवट आहेत.  येत्या काही दिवसांत कोकणातील अनेक सण साजरे होत असल्याने या मार्गावरील वर्दळ वाढणार आहे. त्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी व वाहन चालकांच्या मदतीसाठी १४७ गृहरक्षक दलाच्या जवानांना तैनात करण्यात आले आहे. एक ऑगस्टपासून पुढील तीन महिन्यांसाठी ते याठिकाणी कार्यरत राहणार आहेत.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण  गेल्या ११ वर्षांपासून सुरू आहे. पहिला टप्पा  अद्यापही अपूर्ण   आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. दुसऱ्या टप्प्याचे काम जरी पूर्ण होत आले असले तरी अनेक ठिकाणी कामे  अपूर्ण आहेत. कोकणात गोकुळाष्टमी आणि गणपतीचे आगमन होत आहे. त्यासाठी कोकणात येणाऱ्यांची संख्या नेहमीपेक्षा दुप्पट, तिपटीने वाढत असते, त्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी होत असते. 

महामार्गावर राष्ट्रीय महामार्ग वाहतूक शाखा पोलीस कक्षाच्या पळस्पे, वाकण, महाड, कशेडी, चिपळूण, हातखंबा आणि कसाळ अशा सात पोलीस चौक्या आहेत. वाहतूक सुरळीत ठेवणे, अपघातग्रस्तांना मदत देणे, वाहनांची तपासणी करणे ही यांची नेहमीची कामे आहेत. मात्र, कोकणातील अष्टमी आणि गणेशोत्सवात या ठिकाणी  बाहेरून अतिरिक्त पोलीस मागविण्यात येतात. सध्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे अर्धवट काम पाहता सणामध्ये वाहतुकीस कोणतेच अडथळे निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून १ ऑगस्ट ते ३१ ऑक्टोबर या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी प्रत्येक वाहतूक शाखेमध्ये २१, अशा सात शाखा मिळून १४७ होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. 

वाहतुकीस मदतहे होमगार्ड महामार्गावर २४ तास आपल्या विभागामध्ये कामगिरी बजावणार आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरळीत होण्यास मदत मिळणार आहे. महामार्ग वाहतूक पोलीस शाखा महाड यांच्या अंतर्गत ५७ किलोमीटरचे अंतर आहे. या ठिकाणी तीन महिन्यांसाठी २१ होमगार्ड देण्यात आले आहेत.

टॅग्स :पोलिस