मुंबई : महारेराच्या सलोखा मंचांमुळे घर खरेदीदार तक्रारदारांना तक्रार निवारण करण्यासाठी एक व्यवहार्य पर्याय मिळाला आहे. सध्या राज्यात कार्यरत 52 सलोखा मंचांनी 1470 घर खरेदीदारांच्या तक्रारी यशस्वीपणे निकाली काढल्या आहेत. शिवाय या मंचांकडे सध्या 775 प्रकरणांची सुनावणीची प्रक्रिया सुरू आहे. मुंबई, पुणे , नाशिक, नागपूर अशा अनेक ठिकाणी हे मंच कार्यरत आहेत.
सध्या राज्यात 52 सलोखा मंच सक्षमपणे कार्यरत आहेत. हे सलोखा मंच अधिक प्रभावी आणि सक्षम व्हावे म्हणून सलोखा मंचाच्या सदस्यांसाठी महारेराने 2 दिवसांचे उजळणी अभ्यास शिबिर मुंबईत पवई येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या मदतीने आयोजित केले होते. यात राज्यातील या मंचांमध्ये कार्यरत सुमारे 80 सदस्य सहभागी झाले होते. त्यांना या क्षेत्रातील तज्ज्ञ आणि सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. जे. पी सिंग यांनी मार्गदर्शन केले. महारेराचे मुख्य सल्लागार आणि सेवानिवृत्त सनदी अधिकारी संजय देशमुख यांच्या हस्ते या अभ्यास शिबिराचे उद्घाटन झाले. याप्रसंगी विकासकांच्या स्वयंविनियामक संस्थेचे ज्येष्ठ सदस्य आणि अजमेरा समुहाचे प्रमुख रजनीकांत अजमेरा, मुंबई ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष अॅड. शिरीष देशपांडे, विधी विद्यापीठाचे कुलसचिव डाॅ. प्रतापसिंह साळुंखे, हितेश ठक्कर उपस्थित होते.
सलोखा मंचांमध्ये विकासकांच्या स्वयंविनियामक संस्थांचे आणि ग्राहक पंचायतींचे अनुभवी प्रतिनिधी कार्यरत असतात. प्रत्येक क्षेत्रात दिवसागणिक आणि परिस्थितीनुरूप नवनवीन आव्हाने आणि प्रश्न निर्माण होत आहेत. या मंचांचे सदस्य हे आपल्या इतर दैनंदिन जबाबदाऱ्या सांभाळून या मंचांमध्ये कार्यरत असतात. ते त्यांच्या परीने आणि अनुभवानुसार न्याय देण्यासाठी सक्षमपणे प्रयत्नशील असतातच. परंतु स्थावर संपदा क्षेत्रात दिवसागणिक होत जाणारे बदल, निर्माण होणारी आव्हाने, प्रश्न, विविध राज्यांतील विनियामक क्षेत्रात तक्रारदारांचे प्रश्न सोडविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध पद्धती, तरतुदी, विविध निर्णय याबद्दल त्यांना सविस्तरपणे आणि अधिकृतपणे अवगत करता यावे, त्यांना त्यांच्या सलोखा मंचच्या कामात मदत व्हावी या हेतुने या अभ्यास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सलोखा मंचात कार्यरत असताना निष्पक्षपातीपणा, तटस्थता आणि इतर अनुषंगिक कार्यकौशल्याचे महत्व वादातीत आहे. परंतु शिबिरार्थीना याचे महत्व
पुन्हा अधोरेखित करण्यात आले. याशिवाय या सदस्यांना महारेराचे वरिष्ठ अधिकारी आणि स्वयंविनियामक संस्थांचे पदाधिकारी यांच्याशीही चर्ची करता आली. आपापसातही अनुभवांचे आदान प्रदान करता आले. याचा फायदा या सदस्यांना सलोखा मंचवर काम करताना येथून पुढे मोठ्या प्रमाणात होईल, अशी भावना बहुतेकाने व्यक्त केली.
राज्यभरातील सलोखा मंचच्या सदस्यांसाठी आयोजित दोन दिवसांच्या विशेष शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी दीप प्रज्वलन करताना अजमेरा समुहाचे प्रमुख रजनीकांत अजमेरा. याप्रसंगी(डावीकडून) महारेराचे मुख्य सल्लागार संजय देशमुख, मुंबई ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष शिरीष देशपांडे, महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलसचिव डाॅ. प्रतापसिंह साळुंखे, नरेडकोचे उपाध्यक्ष हितेश ठक्कर आणि या शिबिरातील मार्गदर्शक आणि सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ अॅड जे.पी. सिंग हेही छायाचित्रात दिसत आहेत.