जलजन्य आजारांचे राज्यात १,४७३ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 05:37 AM2019-07-19T05:37:00+5:302019-07-19T05:37:03+5:30

पावसाच्या साचलेल्या दूषित पाण्यामुळे अनेक साथीचे रोग पसरतात.

1,473 cases of waterborne diseases | जलजन्य आजारांचे राज्यात १,४७३ रुग्ण

जलजन्य आजारांचे राज्यात १,४७३ रुग्ण

googlenewsNext

मुंबई : पावसाच्या साचलेल्या दूषित पाण्यामुळे अनेक साथीचे रोग पसरतात. नकळत दूषित पाणी प्यायले जाते. त्यामुळे आजारांना सामोरे जावे लागते. पण जुलाब, कॉलरा, उलटी, टायफॉइड, गॅस्ट्रो, विषाणू, जीवाणूंचे आजार, जंतूची वाढ यांसारखे आजार होतात. राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात यंदा १ हजार ४७३ रुग्णांची नोंद करण्यात आली. दुष्काळामुळे वाढत जाणाऱ्या पाण्याच्या दुर्भिक्षामुळे राज्यावर जलजन्य आजारांचे संकट आले आहे.
अतिसार, जुलाब, कावीळ अशा आजारांचा उद्रेक राज्याच्या वेगवेगळ्या भागात वाढत असल्याचे निरीक्षण आरोग्य विभागाने नोंदविले आहे. पाण्याची पातळी कमी झाल्याने पिण्याच्या पाण्याचे स्रोत प्रदूषित होतात. हे दूषित पाणी पिण्यात आल्याने जुलाब, उलट्या, गॅस्ट्रो आदी जलजन्य आजार होतात.
बाहेरील पाणी व थंड पेये, त्यात वापरलेला बर्फ याद्वारे दूषित पाणी पोटात जाऊ शकते. यात ‘बॅसिलरी डिसेंट्री’ आणि कॉलरा हे आजार प्रामुख्याने होतात. तर, जुलाब हे या दोन्हीचे प्रमुख लक्षण असते. जुलाब होऊन काही तासांतच रुग्णांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते आणि त्यामुळे रुग्णाच्या मूत्रपिंडावर ताण येऊन धोका निर्माण होतो.
त्यामुळे साध्या औषधाने बरे न होणारे व कमी वेळात वारंवार होणारे जुलाब, पोटात पेटके येऊन दुखणे, सतत उलट्या होणे, जुलाब वा उलट्यांमध्ये रक्त जाणे या लक्षणांमध्ये त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक असल्याची माहिती फिजिशिअन
डॉ. सुधीर येवले यांनी दिली आहे. विषमज्वरातही जुलाब, ताप, पोटात पेटके येणे अशी लक्षणे दिसतात तर काविळीत अन्नावरील वासना जाणे, मळमळ अशी लक्षणे दिसून पुढे कावीळ होते. हगवण, ताप, मळमळ, खावेसे न वाटणे या लक्षणांमध्ये वेळीच विषमज्वर वा काविळीची शक्यता पडताळून पाहावी, असा सल्लाही त्यांनी दिला.
>२०१८ ची आकडेवारी
रोग उद्रेक लागण मृत्यू
कॉलरा ५ २४७ ४
गॅस्ट्रो २४ ९६५ ७
अतिसार १८ ८०५ २
कावीळ १० १९३ ०
विषमज्वर १ ७९ ०
एकूण ५८ २२८९ १३
२०१९ ची आकडेवारी
रोग उद्रेक लागण मृत्यू
कॉलरा ० ० ०
गॅस्ट्रो ५ ३९९ ०
अतिसार १० ४७१ ०
कावीळ ८ ५४२ ०
विषमज्वर २ ६१ ०
एकूण २५ १४७३ ०

Web Title: 1,473 cases of waterborne diseases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.