Join us

शाब्बास महाराष्ट्र...! जाता जाता १४९ जणांनी दिली जगण्याची आशा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 7:07 AM

२०२२ मध्ये ९४२ अवयवदात्यांच्या अवयवदानामुळे २६९४ अवयव मिळाले होते.

मुंबई : सर्वश्रेष्ठ दान म्हणून अवयवदानाला संबोधले जाते. याबाबत गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर जनजागृती सुरू असून त्याची फळे आता दिसू लागली आहेत. गेल्यावर्षी देशभरात १०२८ मेंदूमृतांनी अवयवदान केल्याची नोंद झाली असून, दशकभरात प्रथमच अवयवदानाने हजारांचा आकडा पार केला आहे, तसेच अवयवदानाच्या मोहिमेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पाच राज्यांत महाराष्ट्राचा क्रमांक लागला आहे. 

२०२२ मध्ये ९४२ अवयवदात्यांच्या अवयवदानामुळे २६९४ अवयव मिळाले होते. तर २०२३ यावर्षी अवयदात्यांनी सुमारे २८०० अवयव दान केले. गेल्यावर्षी सप्टेंबरपासून ऑनलाइन पद्धतीने अवयवदानाचे प्रतिज्ञापत्र भरून घेण्यास सुरुवात झाली आहे. चार महिन्यांत दीड लाखांहून अधिक नागरिकांनी प्रतिज्ञापत्र भरून अवयवदान करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. येत्या वर्षभरात हा आकडा आणखी वाढणार असल्याचा विश्वास या विषयात काम करणाऱ्या व्यक्तींनी व्यक्त केला आहे. 

गेल्या वर्षात ज्या पाच राज्यांनी सर्वोत्तम कामगिरी केली आहे, त्यामध्ये तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांचा समावेश आहे. तेलंगणा अवयवदानात अग्रेसर आहे. गेल्यावर्षी  तेलंगणामध्ये २००, तामिळनाडू आणि कर्नाटकात प्रत्येकी १७५ जणांनी अवयवदान केले. तर महाराष्ट्रात १४९ आणि गुजरातेत १४६ दात्यांनी अवयवदान केले. अजूनही काही राज्यांच्या अवयदानाची आकडेवारी यायचे काम चालू असल्याचे राष्ट्रीय अवयव आणि उतीपेशी प्रत्यारोपण संस्थेत काम करत असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. 

राष्ट्रीय अवयव आणि उतीपेशी प्रत्यारोपण संस्था ही केंद्रीय आरोग्य विभागातील संस्था असून ती देशभरातील अवयदानाच्या कामकाजावर लक्ष ठेवण्याचे काम करत असते. प्रत्येक राज्यात त्यांच्या अंतर्गत राज्य  अवयव आणि उतीपेशी प्रत्यारोपण संस्था काम करत असते. महाराष्ट्रातील या संस्थेचे कार्यालय केईएम रुग्णालयात आहे. या संस्थेच्या संचालिका डॉ. सुजाता पटवर्धन यांनी सांगितले की, अजून मोठ्या प्रमाणात या विषयावर जनजागृतीची गरज आहे. कारण  राज्यात अवयवांची गरज असणाऱ्यांची मोठी प्रतीक्षा यादी आहे. 

अजूनही काही राज्याच्या अवयवदानाची आकडेवारी मोजण्याचे काम सुरू आहे. फार मोठा फरक पडणार नाही. मात्र आपण यावर्षी अवयवदानात हजारी पार केली आहे. अवयवदान वाढीसाठी आपण नवनवीन आपण योजना आणत आहोत. तसेच आपण राज्यातील सर्व संस्थांना सांगितले आहे की, अवयवदात्यांच्या निधनाच्या वेळी शासकीय सदस्यांनी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली पाहिजे.   - डॉ. अनिल कुमार, संचालक, राष्ट्रीय अवयव आणि उतीपेशी प्रत्यारोपण संस्था

टॅग्स :महाराष्ट्र