१५ दिवसांत मलबार हिल जलाशयासाठी १४९ सूचना; उद्या पाहणीमुळे मुंबईत पाणीकपात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2023 10:47 AM2023-12-17T10:47:59+5:302023-12-17T10:55:00+5:30
जलाशयाच्या पुनर्बांधणीच्या प्रस्तावाचा आढावा घेण्यासाठी आयआयटी मुंबईचे प्राध्यापक, बीएमसीचे अधिकारी आणि स्थानिक तज्ज्ञ यांचा समावेश असलेली समिती स्थापन केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीसाठी जी कार्यपद्धती स्वीकारली जाणार आहे, त्याबाबत नागरिकांनी व तज्ज्ञांनी त्यांच्या सूचना पालिकेला कळवाव्यात, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले होते. त्यानुसार १५ दिवसांत पालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्प विभागाकडे १४९ सूचना आणि हरकती आल्या आहेत.
जलाशयाच्या पुनर्बांधणीच्या प्रस्तावाचा आढावा घेण्यासाठी आयआयटी मुंबईचे प्राध्यापक, बीएमसीचे अधिकारी आणि स्थानिक तज्ज्ञ यांचा समावेश असलेली समिती स्थापन केली आहे. ही समिती या सूचना आणि हरकतींचा अभ्यास करून अहवाल तयार करणार असल्याने या सूचना महत्त्वाच्या ठरणार आहेत. ही समिती उद्या दुसऱ्यांदा मलबार हिल जलाशयाची पाहणी करणार आहे.
मलबार हिल जलशयाच्या पुनर्बांधणीच्या कामामुळे मलबार नैसर्गिक टेकडी, झाडे आणि रस्ता बाधित होईल. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी चिंता व्यक्त केली असून, झाडे व इतर पर्यावरणीय बाबींना धक्का न लावता पर्यायी मार्गाने काम करण्याची मागणी केली आहे. यावर सर्वसमावेशक चर्चा करण्यासाठी आणि पर्यावरणाला हानी न पोहोचवता पर्याय सुचवण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.
पालिका प्रशासनाचा अहवाल
समितीचा अहवाल येईपर्यंत नवीन जलाशयासाठी सध्या सुरू असलेली सर्व कामे स्थगित करण्यात यावीत, अशी मागणी केली आहे. प्रस्तावित जागेत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना बजावण्यात आलेली बेदखल नोटीस मागे घेण्यात यावी, प्रस्तावाबाबतचे सर्व संबंधित अहवाल आणि विश्लेषण पालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावेत, अशी मागणी नागरिक आणि पर्यावरणप्रेमी करत आहेत.
उद्या पाणीकपात
१८ डिसेंबर रोजी तज्ज्ञ समिती पुन्हा जलाशयाची पाहणी करणार असल्याने जलाशयाचा पाण्याचा कप्पा रिक्त करण्यात येणार आहे.
यामुळे मुंबई शहरातील काही भागात १० टक्के पाणीकपात करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
शहरातील ए, सी, डी, जी उत्तर, जी दक्षिण या विभागातील नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना केले आहे.