१४९५ सदनिका व भूखंडांच्या विक्रीसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याकरिता २६ मे पर्यंत मुदतवाढ
By सचिन लुंगसे | Published: May 21, 2024 06:31 PM2024-05-21T18:31:40+5:302024-05-21T18:32:11+5:30
२८ फेब्रुवारी रोजी ९४१ सदनिका व ३६१ भूखंडांच्या विक्रीकरिता मंडळातर्फे सोडत जाहीर करण्यात आली होती.
मुंबई: म्हाडाचा विभागीय घटक छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या अखत्यारीतील छत्रपती संभाजी नगर शहर व जिल्हा, लातूर, जालना, नांदेड, हिंगोली, परभणी आणि धाराशिव येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत १४९५ सदनिका व भूखंडांच्या विक्रीकरिता ऑनलाइन संगणकीय सोडतीसाठी अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेकरिता २६ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
२८ फेब्रुवारी रोजी ९४१ सदनिका व ३६१ भूखंडांच्या विक्रीकरिता मंडळातर्फे सोडत जाहीर करण्यात आली होती. मात्र त्यामध्ये अतिरिक्त १९३ सदनिका व गाळे विक्रीकरिता उपलब्ध देण्यात आले. अर्जदारांना अर्ज सादर करून सोडतीत सहभाग घेण्याकरिता २० मे पर्यंत मुदत देण्यात आली होती. सोडतीत सहभाग घेऊ इच्छिणा-या अर्जदारांना अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत निर्माण झालेल्या समस्यांमुळे मंडळाने अर्जदारांच्या आग्रहास्तव अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीस २६ मे पर्यंत वाढ देण्यात आली आहे.
नवीन वेळापत्रकानुसार अर्जदार २६ मे रात्री ११.५९ पर्यंत अर्ज दाखल करून सोडत प्रक्रियेत सहभाग घेऊ शकतील. अनामत रकमेचा भरणा ऑनलाइन पेमेंटद्वारे २६ मे रात्री ११.५९ वाजेपर्यंत करू शकतील. बँकेत आरटीजीएस / एनइएफटीद्वारे अनामत रकमेचा भरणा २७ मे पर्यंत बँकेच्या कार्यालयीन वेळेत करू शकतील.
https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर सोडतीबाबतची संपूर्ण माहिती व अर्ज नोंदणी प्रक्रिया उपलब्ध आहे.