मुंबई : सध्या वर्क फ्रॉम होम असल्याने ग्राहक पार्सल मागवत नाहीत. तसेच मोठ्या प्रमाणात राज्याबाहेरील कामगार वर्ग निघून गेला आहे. लोक घरात असल्याने जास्त अन्न मागवत नाही. त्यामुळे पार्सल सेवेला १५ ते २० टक्के प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती आहारने दिली आहे.
आहारचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी म्हणाले की, हॉटेल व्यवसाय १० ते १५ टक्क्यांवर आला आहे. त्यात खर्च कसा चालवायचा, कामगारांना पगार कसा द्यायचा आणि वीज बिल आणि इतर शुल्क कसे भरायचे, हा प्रश्न आहे. आता पार्सल सेवा केवळ २० कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल बंद ठेवून पार्सल सेवा आहे; पण त्यातून वीज बिल, भाडे, परवाना शुल्क, ईएमआयचा प्रश्न आहे. हॉटेल व्यवसायावर अनेकांचा रोजगार अवलंबून आहे. हॉटेल बंद पडल्यास त्यांचा रोजगार हिरावला जाईल. हॉटेल व्यवसाय वाचवण्यासाठी सरकारने दिलासा पॅकेज द्यावे, अशी आम्ही वारंवार मागणी केली होती. त्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दखल घेतली आहे.