Join us

प्रवाशांना पुरविलेल्या सुविधांवर साडेचार कोटी खर्च; उड्डाणे रद्द आणि विलंब झाल्याने बसला भुर्दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2019 1:37 AM

हवाईसेवेच्या दर्जाबाबत ८५८ प्रवाशांच्या तक्रारी, १३१ तक्रारी प्रलंबित

खलील गिरकर मुंबई : देशातील हवाई वाहतूक क्षेत्र विस्तारत असताना हवाईसेवेमधील बिघाडांमध्येही वाढ होत आहे. विविध कारणांमुळे विमानाचे उड्डाण वेळेवर न होणे, उड्डाण रद्द होणे अशा प्रकारांमध्ये वाढ होऊ लागली आहे.

जून महिन्यात हवाईसेवेच्या ८५८ तक्रारी करण्यात आल्या. त्यापैकी ७२७ तक्रारींचे निराकरण करण्यात आले, तर १३१ तक्रारींवरील निर्णय अद्याप प्रलंबित आहे. प्रवाशांना परतावा, उड्डाण रद्द झाल्यास त्यांच्या जेवणाची, राहण्याची सोय करणे अशा सुविधांसाठी जुलै महिन्यात सुमारे साडेचार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

विमानांचे उड्डाण रद्द झाल्याचा फटका ४८ हजार २७२ प्रवाशांना बसला. त्यांना पुरविण्यात आलेल्या विविध सुविधा व परतावानिमित्त १ कोटी २१ लाख ३३ हजार रुपये खर्च करण्यात आले. इंडिगोच्या १८ हजार ६७८ प्रवाशांना याचा फटका बसला, तर एअर इंडियाच्या १० हजार प्रवाशांना, स्पाइसजेटच्या १५ हजार १४९ प्रवाशांना, विस्ताराच्या २,७८२ प्रवाशांना उड्डाणे रद्द झाल्याचा फटका बसला.उड्डाणाला २ तासांपेक्षा जास्त विलंब झाल्याचा फटका तब्बल २ लाख ५५ हजार ३३४ प्रवाशांना बसला. त्यांना पुरविलेल्या परतावा, जेवण व इतर सुविधांवर २ कोटी ३ लाख १९ हजार रुपये खर्च करण्यात आले.

इंडिगोच्या सर्वाधिक ९६ हजार ६२० प्रवाशांना याचा फटका बसला. त्या खालोखाल स्पाइसजेटच्या ६४ हजार ६६१ प्रवाशांना, एअर इंडियाच्या ५४ हजार ५२५ प्रवाशांना, एअर एशियाच्या ११ हजार २६६ प्रवाशांना, विस्ताराच्या २३ हजार ४०४ प्रवाशांना याचा फटका बसला.

विमानात प्रवेश नाकारण्याचा फटका २,६४७ प्रवाशांना बसला. त्यांना पुरविण्यात आलेल्या सुविधांसाठी १ कोटी ११ लाख ३९ हजार रुपये खर्च करण्यात आले. यामध्ये एअर इंडियाच्या सर्वात जास्त २,०९४ प्रवाशांना फटका बसला, तर स्पाइसजेटच्या ४३० प्रवाशांना, इंडिगोच्या ९७, विस्ताराच्या १२ व इतर प्रवाशांना याचा फटका बसला.

एअर इंडियाबद्दल जास्त तक्रारीप्रवाशांनी केलेल्या तक्रारींमध्ये सर्वात जास्त तक्रारी एअर इंडियाच्या सेवेबाबत करण्यात आल्या आहेत. एअर इंडियाबाबत ३१५ तक्रारी करण्यात आल्या असून, त्यापैकी १३१ तक्रारी प्रलंबित आहेत.इंडिगोबाबत २८४ तक्रारी करण्यात आल्या असून, स्पाइसजेटबाबत १४६, गो एअरबाबत ७२, एअर एशियाबाबत २६, विस्ताराबाबत १२ तर ट्रु जेटबाबत ३ तक्रारी करण्यात आल्या आहेत. हे प्रमाण दर १० हजारी प्रवाशांमागे ०.७२ टक्के इतके आहे.

टॅग्स :एअर इंडिया