Join us

शहर, पश्चिम उपनगरांत मंगळवारी १५ टक्के पाणीकपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 4:07 AM

मुंबई - अंधेरी पूर्व विभागातील वेरावली परिसरात महापालिकेचे तीन जलाशय आहेत. या जलाशयामधून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी काही ...

मुंबई - अंधेरी पूर्व विभागातील वेरावली परिसरात महापालिकेचे तीन जलाशय आहेत. या जलाशयामधून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी काही तांत्रिक स्वरूपाची उपाययोजना व सुधारणा पालिकेने हाती घेतल्या आहेत. यामुळे दि. ३ ऑगस्ट रोजी कुर्ला - घाटकोपर, अंधेरी पूर्व व पश्चिम, राम मंदिर आणि गोरेगाव पश्चिम या परिसरातील काही भागात सकाळी ८.३० ते रात्री १०.३० पर्यंत पाणीपुरवठा खंडित राहणार आहे. तर शहरातील काही भाग व पश्चिम उपनगरात १५ टक्के पाणीकपात केली जाणार आहे.

वेरावली जलाशय १ व २ येथे पवई - वेरावली जलबोगदा व वेरावली जलाशय क्रमांक १ व २ यांच्यामध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या इनलेटच्या जोडणीचे काम, १२०० मिलिमीटर व्यासाच्या जोडणीवर झडप बसवण्याचे काम व पवई येथे पवई - वेरावली इनलेट शाफ्टवरील फ्लो मीटर बसवण्याचे काम केले जाणार आहे. या काळात मंगळवारी के पूर्व (जोगेश्वरी, अंधेरी पूर्व), के पश्चिम (विलेपार्ले, अंधेरी पश्चिम), पी दक्षिण (गोरेगाव), एल (कुर्ला), एन (घाटकोपर) येथे काही भागात पाणीपुरवठा खंडित राहणार आहे. तसेच के पूर्व आणि पी दक्षिण विभागातील काही भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तर शहर भागात शिवडी, परळ, एलफिन्स्टन हे विभाग वगळता अन्य भागांमध्ये तसेच पश्चिम उपनगरांमधील सर्व विभागांमध्ये १५ टक्के पाणीकपात असणार आहे.