Join us

५० वर्षीय महिलेच्या गुडघ्याच्या सांध्यातून काढली १५ सेंटिमीटरची गाठ

By स्नेहा मोरे | Published: October 04, 2022 6:55 PM

रुग्णालयातील ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. जीत सावला यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया केली आहे.

मुंबई - एका ५० वर्षीय महिलेच्या गुडघ्याच्या सांध्यातील त्वचेच्या आतील भागात वाढणारी १५.७ सेंटिमीटरची गाठ काढण्यात चेंबूर येथील खासगी रूग्णालयातील डॉक्टरांना यश आले आहे. ही महिला अनेक वर्ष लायपोमा म्हणजेच शरीरात चरबीची गाठ तयार होण्याच्या विकाराने त्रस्त होती.

रुग्णालयातील ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. जीत सावला यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया केली आहे. डोंबिवलीमध्ये राहणाऱ्या मिता गाडे या महिलेला गेल्या अनेक वर्षांपासून गुडघेदुखीच्या त्रासाने पिडीत होती, स्थानिक डॉक्टरांकडे बऱ्याचदा उपचार घेतले. परंतु, त्रास कमी होत  नव्हता. काही महिन्यांपासून गुडघ्याचे दुखणं वाढू लागलं होते.

गुडघ्याला सूज सुद्धा आली होती. अशा स्थितीत कुटुंबियांनी तिला डॉ.जीत सावला यांच्या क्लिनीक येथे दाखल केले. या ठिकाणी एमआरआय चाचणी करण्यात आली. या वैद्यकीय चाचणीत महिलेच्या पायातील गुडघ्यात  चरबीची गाठ असल्याचे निदान झाले. ही गाठ महिलेच्या पायातील गुडघ्याच्या त्वचेच्या आतल्या भागात आणि मसल लेयरच्या वर तयार झालेली होती. त्यामुळे महिलेच्या गुडघ्याला सूज आल्याने तिला चालताना त्रास जाणवत होता.

याविषयी, डॉ. जीत सावला म्हणाले , या आजारात शरीरातील कुठल्याही भागात चरबीची गाठ तयार होते. या महिलेच्या पायात चरबीची गाठ बनलेली होती. ही गाठ मुख्यतः त्वचेच्या खाली असते. परंतु, या रुग्णाला ही गाठ स्नायूंच्या खाली आणि हाडांच्या वरती होती. या चरबीच्या गाठीमुळे पायाच्या नसा दाबल्या जात असल्याने त्यांना प्रचंड वेदना जाणवत होती. सहसा या गाठी हात, पाय, पाठ, पोट, मान अशा ठिकाणी शरीराच्या वरच्या भागात आढळतात. परंतु, पहिल्यांदा एका महिलेच्या गुडघ्यात ही चरबीची गाठ दिसून आली आहे. चरबीची गाठ १ ते ३ सेमीची असू शकते. मात्र, ही १५.७ सेंटिमीटर इतकी मोठी होती.’’

लायपोमा म्हणजेच चरबीच्या गाठ तयार होण्याचे निश्चित कारण अजूनही माहिती नाही. परंतु, बरेचदा अशा गाठी होणे हे आनुवंशिक असते. बऱ्याचदा अतिरिक्त वजनामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी एकत्र येऊन हळूहळू त्याच्या गाठी तयार होतात. आणि मग त्या अशा शरीरावर दिसू लागतात. याशिवाय अशा गाठी तयार होण्याचे आणखी एक कारण म्हणजे जंकफूडचे अतिरिक्त सेवन करणे आहे. त्यामुळे शरीरावर चरबीच्या गाठी जरी आल्या तरी त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांच्या सल्ला घेणं आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी नमूद केले.

लायपोमा म्हणजे काय

चरबीच्या पेशींची ही गुठळी होते, शरीराच्या कुठल्याही भागात त्या आढळतात. यात हॅमार्टोमा म्हणजे स्तनांच्या पेशीतील चरबी, तंतूमय घटकांची वाढ होऊन आणि अॅडिनोमायकोएपिथेलीओमा म्हणजे स्तनातल्या दुग्धनलिकांच्या पेशींची वाढ होऊन तयार होणाऱ्या गाठी असे दोन प्रकार आहेत.    

टॅग्स :हॉस्पिटल