पालिकेचे १५ मुख्य अभियंते झाले एकदम खूष! पदोन्नती समितीच्या बैठकीत निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2024 01:17 PM2024-03-03T13:17:20+5:302024-03-03T13:18:05+5:30
...दरम्यान, पालिकेच्या पदोन्नती समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई : प्रभारी म्हणून गेली दोन वर्षे जबाबदारी पार पाडणाऱ्या प्रभारी अभियंता आता कायम अभियंता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पालिकेच्या १५ प्रभारी अभियंत्यांना पदोन्नती दिल्याने कोस्टल रोड, रस्ते व वाहतूक, पर्जन्य जलवाहिन्या, जलअभियंता विभाग, पाणी पुरवठा प्रकल्प यासह महत्त्वाच्या विभागांना कायम अभियंता मिळाले आहेत. दरम्यान, पालिकेच्या पदोन्नती समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
पालिकेच्या अनेक महत्त्वाच्या विभागांचा कारभार सध्या प्रभारी जबाबदारी सोपवून चालवला जात होता. अनेक पदांवर अधिकारी प्रभारी म्हणून काम करत असून त्यामुळे त्यांना एकापेक्षा जास्त पडे सांभाळावी लागत आहेत. साहजिकच त्यांच्यावर कामाचा भर वाढला आहे. शिवाय प्रभारी म्हणून काम करावे लागत असल्याने त्यांच्यात नाराजी होती. पदे कायम करण्याची मागणी करीत अभियंता संघटनांनी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. यातच पालिकेचे सेवानिवृत्त उपायुक्त उल्हास महाले यांना एक वर्षांसाठी मुदतवाढ देण्याची मागणी करणारे पत्र पालिका आयुक्त प्रशासक इकबालसिंह चहल यांनी सरकारला पाठवल्यामुळे सध्याच्या रखडलेल्या पदोन्नतीचा प्रश्न ऐरणीवर आला.
पदोन्नती झालेले अधिकारी
विकास व नियोजन विभाग : सुनील राठोड, इमारत देखभाल विभाग : यतीन दळवी, नागरी प्रशिक्षण केंद्र : गोंविद गारुळे, रस्ते व वाहतूक विभाग : मनीष पटेल, कोस्टल रोड : गिरीश निकम, पर्जन्य जलवाहिनी : श्रीधर चौधरी, जलअभियंता विभाग : पुरुषोत्तम माळवदे, पाणी पुरवठा प्रकल्प : पांडुरंग बंडगर, मलनिःसारण प्रकल्प : शशांक भोरे, मुंबई मलनिःसारण प्रकल्प : राजेश ताम्हाणे, मलनिःसारण प्रचालन : प्रदीप गवळी, घनकचरा व्यवस्थापन : प्रशांत तायशेटे, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प : सुधीर परकाळे, दक्षता विभाग : अविनाश तांबेवाघ यांना कायम करण्यात आले असून नगर अभियंता : दिलीप पाटील, पूल विभाग : विवेक कल्याणकर आणि यांत्रिक व विद्युत विभाग : कृष्णा पेरेकर यांच्यावर प्रभारी म्हणून जबाबदारी ठेवण्यात आली आहे.
असंतोष दूर करण्यासाठी पदोन्नती?
आधीच पदोन्नती रखडल्या असताना निवृत्त उपायुक्तांना पुन्हा संधी देण्याच्या प्रक्रियेमुळे अभियंत्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. त्यांच्यातील असंतोष दूर करण्यासाठी प्रभारी अभियंत्यांची पदोन्नती केल्याचे बोलले जात आहे.