रेन वॉटर हार्वेस्टिंगमुळे ‘मरे’ वाचवणार दीड कोटी
By admin | Published: July 9, 2017 02:26 AM2017-07-09T02:26:05+5:302017-07-09T02:26:05+5:30
मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनसवर रेन हार्वेस्टिंग प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून मध्य रेल्वे दरवर्षी तब्बल १.४४ कोटी रुपयांची
- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनसवर रेन हार्वेस्टिंग प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून मध्य रेल्वे दरवर्षी तब्बल १.४४ कोटी रुपयांची बचत करणार आहे. या प्रकल्पामुळे एलटीटी स्थानकावर दैनंदिन वापराच्या ४० टक्के पाण्याची गरज भागविली जाणार आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) स्थानकावर लांब पल्ल्यांच्या एक्स्प्रेस ट्रेनची वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे एक्स्प्रेस ट्रेनची साफसफाई करणे, उद्यानासाठी वापरले जाणारे पाणी अशा विविध उपयोगासाठी १८ लाख लीटर पाण्याची गरज लागते. एलटीटी स्थानक, फलाट, उद्यान असा सुमारे १२ एकरचा परिसर एलटीटीच्या अखत्यारित येतो.
एलटीटीमधील पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी, रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प उभारण्यात आला आहे. साधारणपणे दोन किलोमीटर अंतरावर एक मीटर लांब आणि दीड मीटर रुंदीचे चर खोदण्यात आले आहेत. चर खोदताना दगडाची रासदेखील रचण्यात आली आहे. त्यामुळे दगडातून पाणी नैसर्गिकरीत्या मुरेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे दहा लाख रुपये खर्चून हा प्रकल्प पूर्ण करण्यात आल्याचे, मध्य रेल्वेच्या वतीने सांगण्यात येत आहे. परिणामी, महिन्याला १२ लाख रुपयांप्रमाणे वर्षाला तब्बल १.४४ कोटी रुपयांची बचत केली जाणार आहे.