१५ कोटींनी खड्डे भरणार; शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात महापालिकेचा भलामोठा खर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 06:14 AM2023-04-29T06:14:15+5:302023-04-29T06:14:47+5:30

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांकडे महापालिका प्रशासनाचेही ‘लक्ष’

15 crores to fill potholes; Big expenditure of municipal corporation in Shiv Sena's stronghold | १५ कोटींनी खड्डे भरणार; शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात महापालिकेचा भलामोठा खर्च

१५ कोटींनी खड्डे भरणार; शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात महापालिकेचा भलामोठा खर्च

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दरवर्षी पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांवर खड्डे पडतात. त्यामुळे महापालिका दरवर्षी पावसाळापूर्व कामे तसेच खड्डे बुजविण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करते. असे असतानाही यंदा मध्य मुंबईतील लालबाग ते धारावी आणि वरळी ते माहीम या दरम्यानच्या रस्त्यांवर पडलेले खड्डे बजुविण्यासाठी महापालिकेकडून तब्बल १५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. यासंदर्भातील निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून, १० मेनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. 

पावसामुळे दरवर्षी मुंबईतील रस्त्यांची दुर्दशा होते. मोठमोठे खड्डे रस्त्यांवर पडतात. खड्डे बुजविण्यासाठी महापालिका कोट्यवधी रुपये खर्च करते. यंदाही या कामासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पश्चिम उपनगरांत सहा, तर पूर्व उपनगरांसाठी दोन अशा आठ कंत्राटदारांची रस्ते दुरुस्तीसाठी नियुक्ती करण्यात येणार असून, मे महिन्यापासून पुढील सहा महिने हे कंत्राटदार कामाची पूर्तता करणार आहेत. मात्र, हा कालावधी पूर्ण होण्याआधीच महापालिकेने मध्य मुंबईतील रस्त्यांवरील खड्डेभरणीसाठी १५ कोटी रुपयांच्या नवीन निविदा काढल्या आहेत. ४ मेपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण करून कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश देण्यात येणार असल्याचे पालिकेच्या रस्ते विभागाकडून सांगण्यात येत आहे.

 कुठे करणार काम? 
मध्य मुंबईतील पालिकेच्या एफ-उत्तर, एफ-दक्षिण, जी- उत्तर, जी- दक्षिण या विभाग कार्यालयाच्या हद्दीत धारावी, माहीम, शिवाजी पार्क, दादर, लोअर परळ, प्रभादेवी, वरळी आदी भागातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यात येणार आहेत. 

लोकप्रतिनिधी नसल्यामुळे महापालिका प्रशासनाला प्रश्न विचारणारे कोणीच नाही, त्यामुळे महापालिकेचा मनमानी कारभार सुरू आहे. मुंबई महापालिकेकडून पैशाची उधळपट्टी केली जात असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयांत लक्ष घालून कारवाई करावी.
- रवी राजा, विरोधी पक्षनेते, काँग्रेस.

निविदा कशासाठी? 
मध्य मुंबईत मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी असून, या भागात दरवर्षी पाऊसही मोठ्या प्रमाणात पडत असल्याने पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी साचून राहते. त्यामुळे रस्त्याची झीज होऊन, काही डांबरी रस्त्यांवर खड्डे पडतात. या खड्ड्यांमुळे मुंबईकरांना त्रास होऊ नये, यासाठी दरवर्षी पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात येत असल्याचे रस्ते विभागाने सांगितले.   

Web Title: 15 crores to fill potholes; Big expenditure of municipal corporation in Shiv Sena's stronghold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.