लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई विमानतळावर नियुक्त असलेल्या सीमाशुल्क विभागातील १५ अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. अन्य अधिकाऱ्यांचे चाचणी अहवाल प्रलंबित आहेत.
मुंबई विमानतळावर दररोज हजारो प्रवासी दाखल होत असतात. त्यापैकी कर चुकवेगिरी करणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्याचे काम सीमाशुल्क विभागाचे अधिकारी करतात. कर्तव्य निभावताना ते असंख्य प्रवाशांच्या, विशेषतः आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संपर्कात येत असतात. त्यामुळे हे अधिकारी संक्रमित झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोरोनाबाधित अधिकाऱ्यांमध्ये आयुक्त, सहायक आयुक्त आणि अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले असून, त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर अधिकाऱ्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. या वृत्तास सीमाशुल्क विभागाकडून अद्याप दुजोरा मिळालेला नाही.