मुंबई : मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईत धडकणारा मराठा मोर्चा आणि प्रजासत्ताक दिन यांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्ताची आखणी केली आहे. दुसरीकडे खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी शहरात २३ जानेवारीपासून ६ फेब्रुवारीपर्यंत पुढील पंधरा दिवस जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत.
मुंबई पोलिसांच्या अभियान विभागाचे उपायुक्त विशाल ठाकूर यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे हे आदेश बजावले आहेत. गर्दीच्या, महत्त्वाच्या आणि अतिसंवेदनशील ठिकाणी बॉम्ब शोधक व नाशक पथके, श्वान पथकांच्या माध्यमातून तपासणी करण्यात येत आहे. तसेच २८ जानेवारीपर्यंत पोलिसांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून २३ जानेवारी मध्यरात्रीपासून ६ फेब्रुवारीपर्यंत १५ दिवस मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.