मुंबई : मध्य रेल्वेमार्गावरील आंबिवली स्थानकातील एकमेव पादचारी पूल १५ दिवसांसाठी दैनंदिन वापरासाठी बंद करण्यात आला आहे. ७ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर या कालावधीत हा पादचारी पूल दुरुस्तीच्या कारणास्तव बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. आंबिवली पूर्व आणि पश्चिम दिशेला जोडणारा हा पूल बंद झाल्याने, पुढील १५ दिवस प्रवाशांना रेल्वे रूळ पार करत प्रवास करावा लागणार आहे.एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर करी रोड, एल्फिन्स्टन आणि आंबिवली स्थानकातील पादचारी पुलाच्या निर्मितीसाठी लष्कराला पाचारण करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. लष्करामार्फत नवा पादचारी पूल हा कसाराच्या दिशेने उभारण्यात येणार आहे. सद्यस्थितीत स्थानकात एकच पादचारी पूल असून, हा पूर्व पश्चिम दिशेला जोडणारा आहे. हा पूल बंद झाल्यास स्थानिकांसह प्रवाशांना रेल्वे रूळ ओलांडण्याशिवाय पर्याय नाही. रेल्वे रूळ ओलांडताना अपघात झाल्यास रेल्वे प्रशासन जबाबदार राहील, अशी भूमिका स्थानिकांनी घेतली आहे.मंगळवारी लष्करी अधिकाºयांनी आंबिवली स्थानकाची पाहणी केली. या वेळी कसारा दिशेला पादचारी पूल उभारण्याची जागा निश्चित करण्यात आली. सद्यस्थितीत स्थानकांतील पूलदेखील मोडकळीस आला आहे. यासाठी पुढील १५ दिवस या पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू राहणार असल्याने, हा पूल वापरासाठी बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
आंबिवलीतील पादचारी पूल १५ दिवस बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 2:52 AM