मुंबई - कर्जमाफी दिलेल्या शेतकऱ्यांची नावं जिल्ह्यातील शिवसैनिकांनी बँकाकडून मागवून घ्यावीत. शेतकऱ्यांनी मते दिली असतील तर त्यांना न्याय देण्याचं काम केलंच पाहिजे. शेतकऱ्यांचे रखडवलेले पैसे त्यांना 15 दिवसांत परत द्या, कारण आज शांत असलेला मोर्चा 15 दिवसानंतर बोलायला लागेल अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पीक विमा कंपन्यांना आणि बँकांना दिला आहे. मुंबईतील बीकेसी परिसरात शिवसेनेने पीक विमा कंपन्यांविरोधात मोर्चा काढला. त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मोठमोठे लोक चुना लावून देश सोडून गेले, माझा शेतकरी देह सोडून जातो. फसवाफसवी खूप झाली, 15 दिवसात मला शेतकऱ्यांची कर्जमाफीची नावे बँकांच्या दरवाजावर दिसली पाहिजेत. शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीचे पैसे अडकवून ठेवले असतील तर 15 दिवसांत त्यांना परत द्या हे मी हात जोडून सांगतो. शिवसैनिकांना आक्रमक व्हायला लावू नका अशा शब्दात उद्धव यांनी पीक विमा कंपन्या आणि बँकांना इशारा दिला आहे.
तसेच मुंबईत शेतकऱ्यांचा मुद्दा घेऊन करणार काय ? असा अनेकांना प्रश्न पडला. शेतकऱ्यांसाठी काढलेल्या या मोर्चाला नौटंकी म्हणणारे नालायक आहेत अशी टीका उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर केली. बीकेसीतील कार्यालये बघितली का नाही ? इथे काही दिवसांनी धडकावे लागणार आहे असं उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना सांगितले.
दरम्यान सरकारने कर्जमाफीचे पैसे बँकाना दिले तर पैसे गेले कुठे? पीक विमा कंपनी, बँकांचे अधिकारी आणि राज्य सरकारने एकत्र येऊन बैठक घ्यावी. जी अडचण असेल त्यांनी बैठकीत मांडावी मात्र शेतकऱ्यांची फसवणूक करु नये, हजारो कोटी रुपये पीक विमा कंपन्यांनी खाल्ले, पंतप्रधान पीक विमा योजना ही पीक विमा कंपन्यांसाठी आणली नाही तर शेतकऱ्यांसाठी आणली आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारला शेतकऱ्यांची जाणीव असेल तर पीक विमा कंपन्यांना का नाही? शेतकऱ्यांच्या योजनांमध्ये येणाऱ्या काळ्या मांजराविरोधात हा मोर्चा आहे असंही उद्धव ठाकरेंनी सांगितले.