मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील ' आदिष ' बंगल्यातील बेकायदा बांधकाम प्रकरणी मुंबई महापालिकेने १५ दिवसांची अंतिम मुदत दिली आहे. या कालावधीत त्यांनी बंगल्यातील बेकायदा बदल हटवणे अपेक्षित आहे. अन्यथा पालिका स्वत: कारवाई करणार आहे.
राणे यांच्या बंगल्यात बेकायदा बांधकाम करण्यात आल्याची तक्रार आल्यानंतर पालिकेने या बंगल्याची गेल्या महिन्यात पाहणी केली होती. ४ मार्च २०२२ रोजी पालिकेने राणे कुटुंबियांना नोटीस पाठवून त्यांच्या घरातील बेकायदा बांधकामाबाबत विचारले होते. यावर त्यांनी बंगल्यातील बांधकाम अधिकृत असल्याचा दावा वकिलामार्फत केला होता. मात्र पालिकेने हा दावा फेटाळून लावला आहे.
त्यानुसार पालिका प्रशासनाने राणे यांना अंतिम नोटीस पाठवली आहे. या नोटीसनुसार बेकायदा बांधकाम १५ दिवसांमध्ये हटवावे अथवा पालिका त्यावर कारवाई करेल असे स्पष्ट करण्यात आले आहे. यापूर्वी पाठवलेल्या नोटीसनुसार आठ मजली बंगल्याच्या केवळ सातव्या मजल्यावर पालिकेने मंजूर केलेल्या आराखड्यापेक्षा वेगळे बांधकाम झालेले नाही. तर इमारतीच्या गच्चीवर, प्रत्येक मजल्यावर बेकायदा बांधकाम झाल्याचा दावा पालिकेने केला होता.
असे आहेत बेकायदा बदल..तळघर - वाहनतळात खोल्या तयार करण्यात आल्या आहेत. पहिला ते तिसरा मजला - उद्यानात खोली तयार करण्यात आली आहे. चौथा मजला - गच्चीवर खोलीचे बांधकाम, पाचवा मजला - गच्चीवर खोली, आठवा मजला -गच्चीवर बांधकाम, गच्ची-पॅसेज भागात बांधकाम.