मुंबई : महापालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्प विभागामार्फत घाटकोपर उच्चस्तरीय जलाशयाच्या पाण्याची टाकी क्रमांक एकचे दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. ही टाकी ३ जूनपासून कार्यान्वित करण्यात येणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी ३ ते १८ जूनपर्यंत पाणी गाळून व उकळून प्यावे. कारण या कालावधीत गढूळ पाणी येण्याची शक्यता आहे, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली.
मुंबई शहर आणि उपनगरात आजही ठिकठिकाणी गढूळ पाणी येते. विशेषत: पूर्व उपनगरातील गोवंडी आणि मानखुर्द या ठिकाणी गढूळ पाण्याची समस्या वारंवार निर्माण होत असून, येथील अर्ध्याहून अधिक भागांना पाणी पुरवठा केला जात नाही. पूर्व उपनगरातील टेकड्यांवर वसलेल्या म्हणजे घाटकोपर असल्फासह भांडुप आणि लगतच्या परिसरात आजही पाण्याचा दाब कमी असून, नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागते. महत्त्वाचे म्हणजे, कमी दाबाच्या पाण्याच्या समस्येसह कमी वेळ येणारे पाणी हीदेखील मोठी समस्या आहे. महापालिकेला अद्याप काही ठिकाणी ही समस्या निकाली काढता आली नसतानाच, मागील महिन्यांपासून पूर्व उपनगरातील कुर्ला, साकिनाका आणि पवई परिसरातील काही ठिकाणी गढूळ पाणीपुरवठा झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे होते. विशेषत: ठिकठिकाणी नादुरुस्त असलेल्या जलवाहिन्यांसह पाणी चोरीसारखे अनेक मुद्दे यास कारणीभूत असून, महापालिकेने अद्याप ही ठोस कार्यवाही केलेली नाही. परिणामी, समस्या निकाली निघण्याऐवजी वाढतच आहे.एल विभागातील बाधित प्रभाग १५७ ते १६१ व १६४संघर्षनगर, खैराणी रोड दोन्ही साइड, सरदार कंपाउंड, डिसूझा कंपाउंड, अयप्पा मंदिर मार्ग, लक्ष्मी नारायण मंदिर मार्ग, यादवनगर, राजीवनगर, अहमद रजा मार्ग, भानुशाली वाडी, कुलकर्णी वाडी, लोयल्का कंपाउंड, सुभाषनगर, बारदान गल्ली, इंदिरानगर, मोहिली पाइपलाइन, परेरावाडी, गणेशनगर, नारायणनगर, नारी सेवा सदन मार्ग, भीमनगर, आंबेडकरनगर/साने गुरुजीनगर, सुंदरबाग, वाल्मिकीनगर, अशोकनगर, हिमालया सोसायटी, संजयनगर, समतानगर, गैबंशा स्कूल, नुराणी मस्जिद, गरिबी हटावनगर, मुकुंद कंपाउंड हे प्रभाग.एन विभागातील प्रभाग १२३, १२४, १२६ ते १३०आनंदगड, शंकर मंदिर, रामनगर, हनुमान मंदिर, राहुलनगर, कैलासनगर, संजय गांधीनगर, वर्षानगर, जय मल्हारनगर, खंडोबा टेकडी, शिवाजीनगर, आंबेडकरनगर, निरंकारी सोसायटी, वर्षानगर टँक, डी आणि सी महापालिका वसाहत, रायगड विभाजी, गांवदेवी, पठाण चाळ, अमृतनगर, इंदिरानगर २, अमिनाबाई चाळ, काठोडी पाडा, भीमनगर, इंदिरानगर १, अल्ताफनगर, गेलदानगर, जब्लुशानगर, गोलीबार रोड, सेवानगर, ओएनजीसी वसाहत, माझगांव डॉक वसाहत, गंगावाडी गेटनगर २ व विक्रोळी पार्क साइडचा अंशत: भाग (म्हणजे आनंदगड उदंचन केंद्राद्वारे होणारा पाणीपुरवठा) सिद्धार्थनगर, साईनाथनगर आणि रोहिदास रोड.