मुंबई/गोंदिया - राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपानंतर भाजपा नेते आक्रमक झाले आहेत. नवाब मलिक हे स्वत:चं पाप झाकण्यासाठी हे बेछुट आरोप करत असल्याचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे. नवाब मलिक ज्या गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, तिथे काल एकाच दिवसात ॲाक्सिजन अभावी १५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. आपल्या कामचुकारपणावर पांघरूण घालण्यासाठी ते भाजपावर बेछूट आरोप करतायेत. अशा संकटाच्यावेळी त्या कुटुंबीयांना मदत करण्याऐवजी ते आपली राजकीय पोळी भाजतायेत. 'नवाबभाई ये पब्लिक है सब जानती है...', असेही त्यांनी म्हटले.
आरोग्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखलघेण्यापेक्षा बघ्याची भूमिका घेत हात झटकले. ॲाक्सिजन अभावी महाराष्ट्रात एकपण मृत्यू झाले नाहीत असं वक्तव्य केलंय. ही कोणती संवेदनशीलता? मागच्या दिड वर्षापासून फ्रंटलाईनवर अथक परिश्रम घेणाऱ्या आरोग्य कर्मचारी व डॅाक्टरांशी सरकारला साधा संवादही करावासा वाटत नाही. कालच मला कळाले आरोग्य कर्मचारी व डॅाक्टर संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. सगळ्या गोष्टी जनतेकडून अपेक्षित आहेत, पण सरकारचा कसलाही ॲक्शन प्लान नाही. या सरकारने बेशरमपणाचा कळस गाठलाय, अशा शब्दात गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं.
महाराष्ट्रात अशा संकटाच्या काळात जे उद्योजक रेमेडिसिवरचा पुरवठा करण्यासाठी स्वत: पुढाकार घेतायेत, त्यांनाच चौकशीला बोलवून पोलिसांच्या बळाचा वापर केला जातोय. यातून आपला काय हेतू आहे? हे दिसून येतंय. आता, असे वाटते की, राजेंद्र शिंगनेंना आता शंभर कोटीचं टारगेट दिले आहे. त्यामुळेच तर ते सरकारी यंत्रणाचा गैरवापर करत आहेत का?, असा टोलाही पडळकर यांनी लगावला आहे.
नवाब मलिक यांचा आरोप
"रात्रीच्या वेळी पोलीस स्टेशनमध्ये दोन विरोधी पक्षनेते आणि दोन आमदार साठेबाजाला वाचवण्यासाठी जातात यामागे काही तरी काळंबेरं आहे," असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी हा आरोप केला. रेमडेसिवीरचा साठा मिळू नये यासाठी भाजपचा प्रयत्न आहे असंही ते म्हणाले. रेमडेसिवीरचा साठा करणार्या ब्रुक्स फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया यांना बीकेसी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर राज्यातील भाजप का घाबरलीय? राज्यातील भाजप वकिली करण्यासाठी का जातेय याचं उत्तर भाजपने जनतेला द्यायला हवे, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.