मुंबई : फेसबुकवर मैत्री करुन महिलांना फसविणा-या ३२ वर्षीय भिकन माळीला मालमत्ता कक्षाने सोमवारी बेड्या ठोकल्या. त्याने मुंबईसह,ठाणे, पुणे नागरपुरमधील शेकडो महिलांना फसविल्याचा संशय पोलिसांना आहे. प्राथमिक तपासात १५ महिलांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहेत.
फेसबुकवर तरुणीच्या नावे खाते तयार करून, आर्थिक संकट, भरभराट किंवा कामात यश मिळावे यासाठी कर्मकांड करण्याच्या बहाण्याने त्याने महिलांना चुना लावला आहे. मानखुर्दचा रहिवासी असलेला माळी हा बारावी शिकलेला आहे. त्याने तयार केलेली सर्व खाती ही महिलांच्या नावे आहेत.
त्याआधारे तो मुंबई, पुणे किंवा नागपूर शहरातल्या महिलांना मैत्रीचे आवाहन करीत असे. मुंबईतल्या एका तरुणीसोबत त्याची अशीच ओळख झाली. या वेळी त्याने नंदिनी कामत या नावाने तयार केलेल्या बनावट खात्याचा वापर केला. काही दिवस संवाद साधल्यानंतर अचानक नंदिनी म्हणजे आरोपी माळीने जर घरात काही अडचण असेल तर सांग, माझा भाऊ पूजा-पाठ, तंत्रमंत्राने अडचण दूर करतो. त्याने अनेकांच्या अडचणी चुटकीसरशी दूर केल्या आहेत, अशी थाप मारली. त्यावर तरुणीने घरात आर्थिक अडचण आहे, असे सांगितले.
ही अडचण दूर करण्याच्या बहाण्याने त्याने तिच्याकडून ६० हजार रुपये उकळले. मात्र त्यानंतर त्याने संपर्क तोडल्याने तरुणीला संशय आला. तिने याबाबत भोईवाडा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन हा गुन्हा मानखुर्द पोलिसांकडे वर्ग केला. मालमत्ता कक्षाकडे हा तपास येताच त्यांनी शिताफिने माळीला बेड्या ठोकल्या. त्याने आतापर्यंत १५ मुलींची लाखोंची फसवणूक केल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.