लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अन्नसुरक्षेचे नियम धाब्यावर बसून व्यवसाय करणाऱ्या हाॅटेल्सवर एफडीएचे बारीक लक्ष आहे. मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या हाॅटेल्स तपासणीच्या मोहिमेत अन्न व औषध प्रशासन विभागाने शहर उपनगरातील तब्बल १५ हाॅटेल्सला टाळे ठोकले आहे.
मुंबईतील एका हॉटेलमध्ये ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या अन्नात मृत उंदीर आढळल्यानंतर एफडीएने ऑगस्टपासून मुंबईतील १३ विभागांमध्ये हॉटेल्सची तपासणी सुरू केली. आतापर्यंत एकूण १५१ हॉटेल्सची तपासणी झाली असून, त्यापैकी १३७ हॉटेल्सना सुधारणा करण्याची नोटीस बजावून त्यांच्याकडून एक लाख सात हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त (अन्न) शैलेश आढाव यांनी दिली आहे.
हीच ती उपाहारगृहे...अंधेरी पूर्व येथील हाॅटेल हायवे इन पार्ट, कांदिवली पश्चिम येथील न्यूयाॅर्क बुरिटो, माटुंग सर्कल येथे सर्कल फूड्स किचन, कांजूरमार्ग पश्चिम येथील राजलक्ष्मी रेस्टाॅरंट, मालाड पूर्व येथील सर्कल कॅफे, घाटकोपर पंतनगर येथील बानी एंटरप्रायजेस, विलेपार्ले पश्चिम येथील काॅफी डे ग्लोबल लि., महमंद अली मार्ग येथील मदिना शरीफ हाॅटेल, धारावी येथील टेस्टी परोठा काॅर्नर इ.
मोहिमेत अन्न व औषध प्रशासनाकडून भारतीय अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचे नियम सांगण्यात येतात. त्याच आधारावर हॉटेल्सची तपासणी केली जाते. बहुतेक हॉटेल्स निर्धारित मानकांचे पालन करण्यास सक्षम नाहीत. अनेक वेळा आम्ही हॉटेल्सना नोटीस देतो आणि त्यांना सुधारणा करण्यास सांगतो. काही कमतरता असतील, तर त्याही दूर करण्यास सांगतो. त्यामुळे काही प्रकरणांमध्ये हॉटेलांना दंडही ठोठावण्यात आला आहे. त्यात गंभीर चूक आढळल्यास त्वरित काम थांबवण्याची सूचना करतो.शैलेश आढाव, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग.