Join us

माटुंगा रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पादचारी पुलाला तडे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 7:52 AM

माटुंगा पश्चिमेकडील पादचारी पूल बंद ठेवण्यात आला आहे. पुलाला तडे गेल्यानं पूल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई - माटुंगा पश्चिमेकडील पादचारी पूल बंद ठेवण्यात आला आहे. पुलाला तडे गेल्यानं माटुंगा रेल्वे स्थानकाला जोडणारा पादचारी पूल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकानं रविवारीपासूनच (15 जुलै ) हा पूल बंद ठेवला आहे. हा पूल खालील बाजूनं झुकलेला असल्यानं आणि धोकादायक स्थितीत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पूल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. पश्चिम रेल्वे मार्गावरील माटुंगा स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी पादचाऱ्यांकडून या पुलाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. दरम्यान, या पुलाचा एक खांब ढासळण्याच्या स्थिती असल्याचं स्थानिकांच्या लक्षात आले आणि त्यांनी याबाबत प्रशासनाकडे तक्रार केली. यानंतर खबरदारी म्हणून महापालिकेनं हा पूल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.  

दरम्यान, 4 जुलैला ग्रँट रोड येथील उड्डाणपुलालाही तडे गेल्याचे समोर आले होते. हा पूल तत्काळ वाहतुकीसाठी बंद करून रेल्वे प्रशासनालाही सतर्क करण्यात आले होते. मात्र केवळ पुलाच्या पृष्ठभागावर भेगा असल्याने कोणताही धोका नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. त्यामुळे हा पूल तात्पुरत्या दुरुस्तीनंतर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता.

ही तर तात्पुरती मलमपट्टी दरम्यान, ग्रँट रोड पुलावरील खड्डे व तडे गेलेल्या ठिकाणी डांबर व खडी टाकण्यात आली. मात्र ही तात्पुरती मलमपट्टी असून महापालिका नागरिकांच्या जिवाशी खेळत असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.

 

 

टॅग्स :मुंबईरेल्वेपश्चिम रेल्वेमुंबई महानगरपालिका