मुंबई - गेल्या तीन दिवसांत मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाने तस्करीच्या एकूण १३ प्रकरणांचा पर्दाफाश केला आहे. याद्वारे एकूण १५ किलो ८९ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ८ कोटी ७ लाख रुपये इतकी आहे. २७ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान सीमा शुल्क विभागाने ही कारवाई केली आहे.
तस्करांनी हे सोने आपल्या कपड्यांमध्ये तसेच बॅगमध्ये चोरकप्पे तयार करत त्यात दडविल्याचे आढळून आले. तर एका तस्कराने आपल्या बॅगेमध्ये एक लोखंडी रॉड ठेवला होता. त्याच्या आतमध्ये सोने लपविल्याचेही आढळून आले. फेब्रुवारी महिन्यात मुंबई विमानतळावर ३० कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या सोन्याची तस्करी सीमा शुल्क विभागाने पकडली आहे. तसेच, सोन्यासोबतच आतापर्यंत एकूण १० आयफोन-१५ ची तस्करी देखील अधिकाऱ्यांनी पकडली आहे.