१५ लाख शेतकऱ्यांकडे ५ ते ८ वर्षांपासून विजेची थकबाकी; चालू बिल भरावे, सक्तीची वसुली कुठेही नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 05:30 AM2023-03-15T05:30:07+5:302023-03-15T05:30:44+5:30
महावितरणची कृषी वीजबिल थकबाकी ४८ हजार ६८९ कोटी रुपये आहे. ती आम्ही वसूल करत नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्यातील १५ लाख २३ हजार ४२६ कृषी पंप ग्राहकांनी पाच ते आठ वर्षात एकदाही वीजबिल भरलेले नाही. अशांना मागील थकबाकी मागत नसून चालू विजेचे बिल भरण्याचे सांगितले जात आहे. सक्तीची वीजबिल वसुली कुठेही सुरू नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले.
फडणवीस म्हणाले, वीजबिल न भरलेल्यांकडून चालू बिलही न मागणे योग्य नाही. महावितरणची कृषी वीजबिल थकबाकी ४८ हजार ६८९ कोटी रुपये आहे. ती आम्ही वसूल करत नाही. दिवसाच्या वीजपुरवठ्यासाठी सरकारकडून अधिकाधिक कृषी फिडरला सौरऊर्जा पुरवली जात आहे. योजना सुरू केल्यापासून १,५१३ मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्पाचे करार केले. ५४८ मेगावॅटचे करार कार्यान्वित झाले, इतर १,०८३ मेगावॅट प्रकल्पाचे करार केलेले आहेत. तसेच १,६५० मेगावॅट प्रकल्पासाठी निविदा प्रसिद्ध केल्या असून एक हजार मेगावॅट प्रकल्पाच्या निविदा प्रसिद्ध करायच्या आहेत. राज्यात सोलरवर शिफ्ट केलेल्या २१७ फिडरचा ९० हजार २७५ ग्राहकांना फायदा होत आहे.
सिंचन प्रकल्प वेगाने पूर्ण करणार
- प्रकल्प वेगाने पूर्ण करून सिंचन क्षमता वाढवणार असल्याचे फडणवीस यांनी यासंदर्भातील प्रश्नावर सांगितले. पैनगंगा- वैनगंगा प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता दिली जाईल. यातून ६२ टीएमसी पाणी मिळेल. नागपूर, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यांना याचा लाभ मिळेल. समुद्रात जाणारे पाणी गोदावरी, तापी खोऱ्यात आणण्यासाठी प्रकल्प आखण्यात आला आहे.
- यात पहिला प्रकल्प दमणगंगा- पिंजाळचा आहे. यातून मिळणारे ३१.६० टीएमसी पाणी मुंबईला देत आहोत. मुंबईला वैतरणातून दिलेले १० टीएमसी पाणी मराठवाड्यासाठी उपलब्ध होईल. तसेच पार गोदावरी, दमणगंगा- वैतारणा, दमणगंगा- एकदरे- गोदावरी या प्रकल्पातून २० टीएमसी पाणी उपलब्ध होईल. जिगाव प्रकल्पासाठीही यावर्षी निधी दिल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"