Join us  

भामट्याने पोलिसाला घातला १५ लाखांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 9:44 AM

या विरोधात जोगेश्वरी पोलिसांनी सलील सांबारी आणि फसलेल्या पोलिसाचा लहानपणीचा मित्र विद्याधर शिरोडकर नामक भामट्यांवर गुन्हा दाखल केला. 

मुंबई : पैशाचे व्यवहार लिखितमध्ये करावे, असा सल्ला जाणकारांकडून दिला जातो. जेणेकरून फसवणूक झाल्यावर आपण कायदेशीर मदत मागू शकतो; पण जोगेश्वरीत एका भामट्याने मेलो तरी पैसे बुडणार नाहीत, असे बॉण्ड पेपरवर पोलिसाला लिहून दिले तरीही १५ लाखांचा गंडा घातला. या विरोधात जोगेश्वरी पोलिसांनी सलील सांबारी आणि फसलेल्या पोलिसाचा लहानपणीचा मित्र विद्याधर शिरोडकर नामक भामट्यांवर गुन्हा दाखल केला. तक्रारदार अशोक भरते (५२) हे हवालदार सहा वर्षांपासून पोलिस दलात संरक्षण आणि सुरक्षा विभागात कार्यरत आहेत. शिरोडकर हा त्यांचा लहानपणीचा मित्र असून त्याने सांबारीची ओळख भरतेशी शेअर ट्रेडर म्हणून करून दिली होती. सांबारी हा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यावर महिन्याला दहा टक्के व्याज देतो, असे भरते यांना सांगितले. तेव्हा भरते हे शिरोडकर सोबत सांबारीच्या जोगेश्वरी या ठिकाणी जाऊन भेटले. तेव्हा सांबारीनेदेखील महिन्याला दहा टक्के व्याज देणार, माझा मृत्यू झाला तर त्यांचे मुद्दल परत मिळेल, असे सांगितले. 

फसवणूक केल्याचा भरते यांचा आरोप - या गुंतवणुकीसाठी एक वर्षाचा लॉक इन पिरेड असेल, असे मुद्दे नमूद असलेला बॉण्ड पेपर बनवून त्यावर सही केली. - १० लाख त्याच्याकडे गुंतवले. तसेच अजून दोन मित्रांनाही गुंतवणूक करायला सांगितली. त्यानुसार त्यांचे मित्र सतीश नाईक यांनी पाच तर अनिकेत पोर्टे यांनी तीन लाख सांबारीकडे गुंतवणुकीसाठी दिले. - १८ लाखांवर तीन लाख रुपये परतावा सांबारीने दिला. मात्र, नंतर उर्वरित पैशावरील व्याज १४ लाख तसेच मुद्दल १८ लाख रुपये त्याने लंपास केले. - भरते यांनी वारंवार भेट घेत तसेच फोन करत व्याज द्यायला जमत नसेल तर मुद्दल परत करा, असे सांबारीला सांगितले. - मात्र, तो टाळाटाळ करून उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच अन्य लोकांचीदेखील फसवणूक केली.

टॅग्स :धोकेबाजीपोलिस