वर्षभरात ४,२६३ प्रसूती रुग्णवाहिकेत; १० लाखांहून अधिक रुग्णांसाठी १०८ ठरली नवसंजीवनी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 05:07 AM2020-01-16T05:07:46+5:302020-01-16T07:00:21+5:30
सध्या राज्यात ९३७ रुग्णवाहिका चालविल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी राज्यात मुंबईमध्ये बाईक अॅम्ब्युलन्स सुरू करण्यात आली.
स्नेहा मोरे
मुंबई : राज्य शासनाची १०८ ही रुग्णवाहिका चाकावरचे प्रसूतिगृह ठरले असून आतापर्यंत सहा वर्षांत ३७ हजार प्रसूती या रुग्णवाहिकेत झाल्या आहेत. गेल्या वर्षभरात २०१९मध्ये ४ हजार २६३ अशा सुमारे ३७ हजार २६३ गर्भवतींचे सुखरूप बाळंतपण करण्यात यश मिळाले आहे.
आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय उपचारांसाठी सुरू करण्यात आलेल्या रुग्णवाहिकेमुळे राज्यभरात गेल्या सहा वर्षांत सुमारे ५२ लाख ६५ हजार ६१० रुग्णांना जीवनदान मिळाले आहे. तर गेल्या वर्षभरात १० लाख २० हजार ६१० रुग्णांना नवसंजीवनी दिली आहे. जानेवारी ते डिसेंबर २०१९ या कालावधीत या रुग्णवाहिकेत ४ हजार २६३ बाळंतपणे सुखरूपपणे पार पडली आहेत. त्याचप्रमाणे, २०१४ मध्ये २ हजार १०० , २०१५ मध्ये ४ हजार २१३ , २०१६ मध्ये ६ हजार, २०१७ मध्ये ६ हजार ५८० , २०१८ मध्ये सर्वाधिक ११ हजार १४१ प्रसूती रुग्णवाहिकेत करण्यात आल्या आहेत.
गेल्या वर्षांत सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे या पूरग्रस्त भागातदेखील या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून सुमारे हजारो नागरिकांना पूरग्रस्त भागातून रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याची माहितीही मुख्य कार्यान्वयन अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शेळके यांनी दिली. रस्ता अपघात, नैसर्गिक आपत्ती, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला गोल्डन अवरमध्ये उपचार मिळण्याकरिता अत्याधुनिक रुग्णवाहिकेची सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी १०८ हा क्रमांक देण्यात आला असून राज्यातील लाखो नागरिकांसाठी हा क्रमांक जीवनदायी ठरला आहे.
२०१९ या वर्षभरात सुमारे ५८ हजार ४४३ रस्ते अपघातांतील जखमींना रुग्णालयात दाखल करण्याचे काम या रुग्णवाहिकेमुळे शक्य झाले आहे. अपघातानंतर लगेचच आवश्यक ती प्राथमिक उपचार सेवा मिळाल्याने लाखोंचे प्राण वाचले आहेत. आतापर्यंत विविध १३ प्रकारच्या वैद्यकीय आपत्कालीन स्थितीतील सुमारे १० लाख २० हजार ६१० रुग्णांना वेळेत उपचार मिळाले आहेत, असे डॉ. शेळके यांनी सांगितले.
राज्यभरात ३० बाइक अॅम्ब्युलन्स कार्यरत
सध्या राज्यात ९३७ रुग्णवाहिका चालविल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी राज्यात मुंबईमध्ये बाईक अॅम्ब्युलन्स सुरू करण्यात आली. त्या माध्यमातून आतापर्यंत हजारो रुग्णांना सेवा देण्यात आली आहे. या सेवेचा विस्तार करीत मुंबईमध्ये १८, पालघर, अमरावती येथे प्रत्येकी पाच, तर सोलापूर आणि गडचिरोली येथे प्रत्येकी एक अशा एकूण ३० बाईक अॅम्ब्युलन्स सध्या कार्यरत असल्याचे डॉ. शेळके यांनी सांगितले.