मुंबई: गोरेगाव येथील जय भवानी इमारतीला लागलेल्या आगीची चौकशी करणाऱ्या समितीचा अहवाल पालिका आयुक्तांना सादर करण्यात आला असून भविष्यात आगीच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी १५ उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने मंजूर केलेल्या २२७ इमारतींचे नियमित फायर ऑडिट करणे आवश्यक, इमारतीमध्ये प्रत्येक मजल्यावर खुली जागा असावी, पार्किंगच्या जागेचा अन्य कामासाठी वापर करू नये, लिफ्टचे दरवाजे जाळीऐवजी बंद स्टीलचे असावेत या प्रमुख शिफारशी अहवालात करण्यात आल्या आहेत.
आग लागल्यास जाळी असणाऱ्या लिफ्टच्या जागेतून आग आणि धूर पसरण्यास वाव मिळतो, त्यामुळे दरवाजे बंद आणि स्टीलचे असणे सक्तीचे करण्यास सांगण्यात आले आहेत. पुनर्वसन इमारतींचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर प्राधिकरण, अग्निशमन दल व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या संयुक्त तपासणीनंतर अंतिम भोगवटा प्रमाणपत्र देण्यात यावे. या इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत असल्याबाबतचे प्रमाणपत्र नियमानुसार प्राप्त होत असल्याबद्दल तपासणी करणारी यंत्रणा अग्निशमन दलाने निर्माण करण्यास सक्तीचे करावे. पार्किंगच्या जागेचा सुयोग्य वापर, इमारतीतील मोकळी जागा, आग लागेल असे सामान ठेवण्यास मनाई करावी. प्राधिकरणाने समिती स्थापन करून या नियमांचे पालन होते की नाही याबाबत वेळोवेळी तपासणी करावी असेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
आग लागल्यास रहिवाशांना सुरक्षितपणे बाहेर पडता यावे यासाठी अग्निशमन दलाने सुचवलेल्या ठिकाणी विशिष्ट शिडीची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले आहे. ज्या इमारतींमध्ये अग्निशमन खात्यामार्फत ना-हरकत प्रमाणपत्र दिले असेल, अशा प्रकरणांमध्ये प्राधिकरणाने भोगवटा प्रमाणपत्र देण्यापूर्वी विकासकाने अटींची पूर्तता केली आहे की नाही याची खातरजमा होईपर्यंत भोगवटा प्रमाणपत्र देऊ नये असे स्पष्ट करण्यात आले आहे.मुंबईत ज्या ठिकाणी अरुंद गल्ल्या असतील अशा ठिकाणी दुचाकी व चारचाकी वाहन पार्किंगबाबत नियमावली बनवून तिचे पालन करण्यासंदर्भात पोलीस प्रशासनाला निर्देश देण्याचे सांगण्यात आले आहे.