फेरतपासणीत आणखी १५ पूल धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 06:09 AM2019-05-22T06:09:46+5:302019-05-22T06:09:49+5:30

पूर्वीच्याच सल्लागार कंपनीकडून आॅडिट : पूर्व, पश्चिम उपनगरातील २९ पुलांमुळे प्रवाशांच्या जीवाला धोका

15 more risks in the investigation | फेरतपासणीत आणखी १५ पूल धोकादायक

फेरतपासणीत आणखी १५ पूल धोकादायक

googlenewsNext

मुंबई : स्ट्रक्चरल आॅडिटरने सुस्थितीत असल्याचे प्रमाणपत्र दिलेला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील पादचारी पूल कोसळल्यानंतर महापालिका प्रशासनाने मुंबईतील सर्व पुलांची फेरतपासणी सुरू केली. मात्र या नवीन आॅडिटमध्ये पश्चिम आणि पूर्व उपनगरातील आणखी १५ पूल अतिधोकादायक असल्याचे आढळून आले आहे. हे पूल तत्काळ पाडण्यात आले तरी त्यांची पुनर्बांधणी मात्र पावसाळ्यानंतरच सुरू होणार आहे.ट


मुंबईतील ३४४ पुलांचे महापालिकेने आॅडिट केल्यानंतर त्यातील १४ पूल तत्काळ पाडण्याची शिफारस संबंधित आॅडिट कंपनीने केली होती. मात्र मार्च महिन्यात कोसळलेला हिमालय पादचारी पूल धोकादायक पुलांच्या यादीत नव्हता. या दुर्घटनेत सात लोकांचा मृत्यू झाला तर ३० जण गंभीर जखमी झाले. त्यामुळे या घटनेचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटून आॅडिटच्या अहवालावर संशय व्यक्त होऊ लागला. अखेर महापालिकेने सर्व पुलांचे पुन्हा आॅडिट करण्याचा निर्णय घेतला.


त्यानुसार पश्चिम आणि पूर्व उपनगरातील आॅडिटचे काम पूर्वीच्याच सल्लागार कंपनीला देण्यात आले. हा अहवाल आता प्राप्त झाला आहे. यामध्ये आणखी १५ पूल धोकादायक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आधीच्या आॅडिटमध्ये धोकादायक ठरलेले १४ आणि आता १५ असे एकूण २९ पूल मृत्यूचा सापळा ठरले आहेत. यापैकी पूर्वीच्या यादीतील १४ धोकादायक पुलांपैकी काही पूल पाडण्यात आले आहेत. मात्र अद्याप या पुलांच्या पुनर्बांधणीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.

‘ते’ पूल नदी-नाल्यांवर
पहिल्या आॅडिट अहवालात धोकादायक ठरलेले पूल रहदारी तसेच वाहतुकीसाठी महत्त्वाचे असल्याने तत्काळ पाडण्यात आले आहेत. ११ पैकी पाच पूल आतापर्यंत पालिकेने पाडले. मात्र फेरतपासणीत धोकादायक ठरलेले पूल नदी-नाल्यांवरील असल्याने चिंतेचे कारण नाही, असा दावा पालिका अधिकारी करीत आहेत. परंतु किरकोळ आणि मुख्य दुरुस्तीच्या पूर्वीच्या शिफारशींमध्येही काही ठिकाणी बदल करण्यात आल्याचे समजते.
शहरातील पुलांचे आॅडिट रखडले
शहरातील ८२ पुलांचे आॅडिट करणाऱ्या स्ट्रक्चरल आॅडिटर डी. डी. देसाई कंपनीच्या नीरज देसाईला हिमालय पूल दुर्घटनाप्रकरणी अटक झाली आहे. या कंपनीची पॅनलवरून हकालपट्टी केल्यानंतर पालिकेने नवीन आॅडिटरचा शोध सुरू केला आहे. परंतु एकच ठेकेदार पुढे आल्यामुळे शहरातील पुलांच्या आॅडिटचे काम रखडले आहे.

फेरतपासणीत धोकादायक पूल
वाकोला पाइपलाइन सर्व्हिस रोड पूल, जुहू तारा रोड येथील नाल्यावरील पूल, धोबी घाट मजास नालावरील पूल, अंधेरी श्याम नगर मेघवाडी नाल्यावरील पूल, वांद्रे धारावी नदीवरील पूल, कांदिवली रतन नगर ते दौलत नगर पूल, गोरेगाव ओशिवरा नाला, गोरेगाव जोड रस्ता पिरामल नाला, मालाड जोड रस्ता चंदावकर नाला, मालाड गांधी नगर पूल, मालाड प्रेम सागर नाला, बोरीवली फॅक्टरी लेन, घाटकोपर कन्नमवर नगर.

अतिधोकादायक
ओम्कारेश्वर मंदिर - कांदिवली, इराणीवाडी - विठ्ठल मंदिर, कांदिवली - एसव्हीपी रोड, साकीनाका - खैरानी रोड, सांताक्रुझ - चेंबूर जोड रस्ता हन्स बुर्ग मार्ग, दहिसर - एसीबी कॉलनी, गोरेगाव पूर्व - वालभट्ट नाला येथील पूल.

Web Title: 15 more risks in the investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.