महामुंबईत महिनाभरात १५ जणांचा बुडून मृत्यू; पावसाळी पर्यटन बेतू शकते जीवावर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 07:25 AM2024-07-01T07:25:33+5:302024-07-01T07:25:55+5:30
महामुंबईत महिनाभरात वेगवेगळ्या घटनांमध्ये १५ जणांचा बुडून मृत्यू झाला.
मुंबई - पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथील भुशी धरणाच्या मागील बाजूला धबधब्याच्या प्रवाहातून एकाच कुटुंबातील चार मुले व एक महिला असे पाच जण रविवारी वाहून गेले. धबधबे, समुद्राच्या पाण्यात योग्य काळजी न घेतल्याने पर्यटकांना नाहक जीव गमवावा लागतो. महामुंबईत महिनाभरात वेगवेगळ्या घटनांमध्ये १५ जणांचा बुडून मृत्यू झाला.
ठाणे जिल्ह्यात दोघांचा मृत्यू
बदलापूरजवळील कोंडेश्वर धबधब्यात बुडून २२ वर्षीय तरुण अनुप मिश्रा याचा गुरुवारी मृत्यू झाला. नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे तो राहत होता. - कल्याण पश्चिमेकडील रिंग रोड परिसरात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या ११ वर्षीय प्रथमेश वाळके याचा विहिरीच्या पाण्यात बुडून
मृत्यू शुक्रवारी मृत्यू झाला. वाडेघर परिसरात आईवडील बहिणीसोबत तो राहत होता.
रायगडमध्ये १३ बळी
पावसाळा सुरू झाल्यापासून रायगड जिल्ह्यात सात अल्पवयीन मुलांसह १३ जणांचा बुडून मृत्यू झाला.
२५ मे : माणगाव तालुक्यातील भिरा गावात पर्यटकाचा नदीत बुडून मृत्यू.
२८ मे : काशीद समुद्रकिनारी पर्यटकाचा मृत्यू.
९ जून : उरण, पिरकोन गावात २५ वर्षीय महिला आणि तिच्या सात वर्षांच्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू.
१३ जून : अलिबाग समुद्रात बुडून तरुणाचा मृत्यू.
२१ जून : पोखरवाडी धरणात मुंबईतील १७ ते २६ वयोगटातील चार. विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू.
२२ जून : दादली गावातील २१ वर्षीय तरुणाचा सावित्री नदीत पाय घसरून बुडाल्याने मृत्यू.
२२ जून : काल नदीत पोहताना ३२ वर्षीय व्यक्तीचा बुडून मृत्यू झाला.
२३ जून : अलिबाग मुनवली गावात दोन किशोरवयीनांचा तलावात मृत्यू.