Join us

पहिल्याच दिवशी ‘क्लीनअप मार्शल्स’ने ठोठावला १५ जणांना दंड; २,८०० वसूल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2024 10:48 AM

पारदर्शक व्यवहारासाठी मोबाइल ॲपद्वारे दिली जाते पावती.

मुंबई : सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेचे नियम मोडणाऱ्यांवर बुधवारपासून पालिकेच्या क्लीनअप मार्शल्सने कारवाई सुरू केली आहे. पहिल्याच दिवशी १५ जणांवर कारवाई करून २ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पारदर्शकतेसाठी दंडाची पावती मोबाइल ॲपद्वारे देण्यात येत आहे.

मुंबईतील सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये नियुक्त सर्व क्लीन अप मार्शल संस्थांना त्याचे प्रशिक्षण मंगळवार, २६ मार्च २०२४ रोजी देण्यात आले. प्रत्येक प्रशासकीय विभागात ३० याप्रमाणे संपूर्ण मुंबईत मिळून सुमारे ७०० क्लीनअप मार्शल कार्यरत केले आहेत. 

प्रायोगिक तत्त्वावर डिजिटल कारवाई सुरू केल्यानंतर, त्यातून येणारा अनुभव लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने संपूर्ण मुंबईत याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. क्लीनअप मार्शल पुरविण्यात आलेल्या ॲपचे वैशिष्ट्य म्हणजे एखाद्या व्यक्तीला दंडाची रक्कम ऑनलाइन भरण्याची सुविधा असून त्यासाठी क्यूआर कोड स्कॅन अथवा यूपीआयद्वारे रक्कम ऑनलाइन भरता येते.  

त्याचप्रमाणे मोबाइल क्रमांक पुरवलेल्या नागरिकांना त्यांच्या मोबाइलवर एसएमएसद्वारे देखील भरणा करण्यासाठी लिंक देण्यात येत आहे. ही प्रक्रिया नागरिक आणि मार्शल्स दोघांसाठी उपयुक्त ठरत असून अरेरावीला लगाम बसणार आहे.

दंडाच्या पावतीवर नाव, दिनांक, वेळ नागरिकांना मिळालेल्या पावतीवर महापालिकेचे बोधचिन्ह, तसेच पावती क्रमांक असेल. पालिकेच्या विभागाचे नाव, दिनांक, वेळ तसेच कारवाई केलेल्या जागेचा अक्षांश, रेखांशीदेखील असणार आहे. म्हणजेच, पावतीमध्ये गैरव्यवहाराला कोणताही वाव राहणार नसून अगदी ‘स्वच्छ’ दंड आकारला जाणार आहे. 

असा असणार दंड - 

१) रस्त्यावर घाण करणे                                 २०० रुपये 

२)  थुंकणे                                                     २०० रुपये 

३) रस्त्यावर अंघोळ                                       १०० रुपये 

४) रस्त्यावर शौच                                           १०० रुपये 

५) जनावरे / पक्षांना खाद्यपदार्थ घालणे          ५०० रुपये 

६) रस्त्यावर गाड्या धुणे                                 २०० रुपये 

७) रस्त्यावर कपडे किंवा इतर गोष्टी धुणे        २०० रुपये 

८) स्वच्छ अंगण उपविधीअंतर्गत खासगी अंगण अस्वच्छ असल्यास                              १०० रुपये 

९) इतरांकडून अस्वच्छता झाल्यास                १ हजार रुपये 

१०)  जैववैद्यकीय कचरा वर्गीकृत करून न देणे                                                           २० हजार रुपये 

११) सुका कचरा वर्गीकृत न करणे                  १०० रुपये 

१२)  उद्यानातील कचरा वर्गीकृत न करणे      १०० रुपये 

१३) कचरा जाळणे                                        १०० रुपये 

१४) विकास बांधकामाजवळ असलेला कचरा वर्गीकृत न केल्यास                            २० हजार रुपये  

१५)  बॅनर्स, पोस्टर चटकवणे                        ५०० ते ५ हजार रुपये 

१६)  रस्त्यावर धूळखात असलेल्या गाड्या     ५०० रुपये

टॅग्स :मुंबईनगर पालिका