Join us

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, पुढील सात दिवस १५ टक्के पाणीकपात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 10:05 AM

टान्सफॉर्मरला लागलेल्या आगीचा परिणाम; ठाणे, भिवंडी परिसरालाही फटका.

मुंबई : महानगरपालिकेच्या पिसे जल उदंचन केंद्रात ट्रान्सफार्मरला लागलेल्या आगीमुळे पाणी पुरवठ्याची विस्कळीत झाला आहे. ही यंत्रणा पूर्वपदावर आणण्यासाठी आणखी ६ ते ७ दिवसांचा कालावधी लागणार आहे. सध्या या केंद्रातील दोन ट्रान्सफार्मर कार्यरत असून, त्याआधारे २० पैकी १५ पंप सुरू करण्यात आले आहेत. मात्र तिसऱ्या ट्रान्सफार्मरची दुरूस्ती होईपर्यंत मंगळवारी मध्यरात्रीपासून ते ५ मार्चपर्यंत मुंबई शहर, पश्चिम उपनगरे, पूर्व उपनगरे तसेच ठाणे शहर, भिवंडी परिसरात १५ टक्के पाणी कपात लागू करण्यात येणार आहे. 

पालिकेने दिलगिरी व्यक्त केली असून, या पाणी कपातीच्या कालावधीमध्ये पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन केले आहे. पालिकेच्या पिसे येथील जलउदंचन केंद्रात ट्रान्सफार्मरला सोमवारी रात्री सायंकाळी लागलेली आग रात्री दहा वाजता विझवण्यात यश आले. त्यानंतर रात्री बारा वाजेच्या सुमारास एक ट्रान्सफार्मर सुरू करून त्यावर हळूहळू आठ पंप सुरू करण्यात आले. त्यानंतर मंगळवारी पहाटे चार वाजल्यापासून पांजरापूर येथील जलशुद्धिकरण केंद्रातील सुमारे आठ पंप सुरू करण्यात आले. यामुळे सकाळी नऊ वाजेपासून पूर्व उपनगरे आणि शहर विभागातील गोलंजी, रावळी, फॉसबेरी व भंडारवाडा सेवा जलाशयातून कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. मंगळवारी सकाळी ११:०० वाजता दुसऱ्या ट्रान्सफॉर्मरची पाहणी करून तोदेखील सुरू करण्यात आला.

ठाणे, भिवंडीलाही फटका :

पिसे उदंचन केंद्रासह पांजरापूर जलशुद्धिकरण केंद्र कार्यान्वित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे १५ टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. ठाणे शहर, भिवंडी व नगर बाह्य विभाग येथील मुंबई २ व ३ जलवाहिन्यांतून होणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये १५ टक्के पाणी कपात लागू करण्यात येत आहे. या पाणी कपातीमुळे पाणीपुरवठ्याच्या शेवटच्या टोकाचा भागात  अपुरा पाणीपुरवठा जाणवू शकतो. 

अर्धा तास आधीच पाणी पुरवठा बंद :

विक्रोळी टागोर नगर, कन्नमवार नगर, घाटकोपर, भांडुप, या उपनगरातील काही विभागात पाणी आले नव्हते. तर याच विभागातील काही भागात मात्र पाणी होते. काही भागात सकाळच्या वेळेत पाणी सोडण्यात आले. तर काही भागात संध्यकाळी पाणी सोडण्यात आले होते. अनेक ठिकाणी पाणी पुरवठ्याच्या वेळेत कपात करण्यात आली होती. भांडुपच्या प्रतापनगर भागात पहाटे पाच ते सकाळी साडेनऊ या वेळेत पाणी सोडले जाते मात्र आज अर्धा तास आधीच पाणी पुरवठा बंद झाल्याचे रहिवाश्यांनी सांगितले.

टॅग्स :मुंबईपाणीकपात