Join us

मुंबईत दाेन दिवस १५ टक्के पाणीकपात; मुलुंडमध्ये जलवाहिनी फुटल्याचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 10:06 AM

मुंबई शहर व पूर्व उपनगरात २९ मार्चपर्यंत पालिकेने १५ टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : पूर्व द्रुतगती महामार्गावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी)तर्फे पर्जन्य जलवाहिनीचे काम सुरू असताना मुंबईलापाणीपुरवठा करणारी वाहिनी मुलुंड येथे सोमवारी फुटली. या घटनेमुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली असून पालिकेने जलवाहिनी दुरुस्तीचे काम तत्काळ हाती घेतले. या कामामुळे मुंबई शहर व पूर्व उपनगरात २९ मार्चपर्यंत पालिकेने १५ टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुलुंड जकात नाका परिसरात हरिओम नगर येथील मुंबई महापालिकेच्या २,३४५ मिलीमीटर व्यासाच्या ‘मुंबई -२’ जलवाहिनीला एमएसआरडीसीतर्फे बॉक्स कर्ल्व्हटचे काम सुरू असताना गळती लागली. पिसे-पांजरापूर संकुलातून पाणी वाहून आणणाऱ्या या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पाणी पुरवठा विभागाकडून तातडीने हाती घेण्यात आले. बुधवार २९ मार्चपर्यंत पूर्व उपनगरे आणि शहर विभागातील बहुतांश परिसरात १५ टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. मुंबईकरांनी या कालावधीत पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा. तसेच, पाणी कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

या भागात होणार पाणी कपात

पूर्व उपनगरे - टी विभागः मुलुंड (पूर्व) व (पश्चिम) विभाग एस विभागः भांडुप, नाहूर, कांजूरमार्ग, विक्रोळी येथील पूर्व विभाग.एन विभागः विक्रोळी, घाटकोपर येथील (पूर्व) व (पश्चिम) एल विभागः  कुर्ला (पूर्व) एम पूर्व/पश्चिम विभागशहर विभाग – ए विभाग, बी विभाग, ई विभाग, एफ दक्षिण आणि  उत्तर विभाग

टॅग्स :पाणीमुंबई