- सीमा महांगडे मुंबई - पिसे येथील बांधावरील गेटच्या ३२ पैकी एका रबरी ब्लाडर मधे शनिवारी अचानक बिघाड झाल्याने पाणी गळती सुरू झाली. याची दुरुस्ती करण्यासाठी पिसे येथील पाण्याची पातळी ३१ मीटर पर्यंत खाली आणण्यासाठी पालिकेच्या जल अभियंता विभागाला भातसा धरणातून येणारा पुरवठा नियंत्रित करावा लागला. त्यानंतर पालिकेकडून रबरी ब्लाडर दुरूस्तीचे काम हाती घेऊन पूर्ण करण्यात आले. या काळात भातसा धरणातून पुन्हा पाणी सोडण्यात आले असले तरी बंधा-याची पाणी पातळी पूर्ववत होण्यासाठी वेळ लागणार आहे. यासाठी मंगळवारी एका दिवसासाठी संपूर्ण मुंबईत १५ टक्के पाणीकपात केली जाणार आहे.
भातसा धरणातून सोडण्यात आलेले पाणी पिसे येथे बंधारा बांधून तयार केलेल्या जलाशयामध्ये साठविले जाते. पालिकेच्या पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रामध्ये प्रक्रिया करून येवई येथील महासंतुलन जलाशया मार्फत मुंबईकरांना हा पाणीपुरवठा केला जातो. यामध्ये शनिवारी , १६ मार्चला अचानक बिघाड झाला. त्यातून पाणी गळती झाली. बंधा-यातील पाणीपातळी ३१ मीटर पर्यंत आल्यानंतर दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले. सोमवारी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत यांत्रिक झडपा दुरूस्तीचे काम पूर्ण करण्यात आले. दरम्यान पाणी कपाती दरम्यान मुंबईकरांनी पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा असे आवाहन पालिकेने केले आहे.