Join us  

महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकावर जमावाची दगडफेक, अधिकाऱ्यांसह १५ पोलिस जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2024 6:36 AM

पवईच्या जयभीमनगर भागातील अतिक्रमण हटवण्याची नोटीस महापालिकेने संबंधित बांधकामधारकांना ३ जून रोजी दिली होती.

मुंबई : पवईत बेकायदा झोपड्यांवर कारवाईसाठी गेलेल्या मुंबई महापालिकेच्या एस वॉर्डच्या पथकावर झोपडीधारकांनी  केलेल्या दगडफेकीत काही पोलिस, पालिका अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले. पोलिसांनी संतप्त जमावाला नियंत्रित करण्यासाठी सौम्य लाठीमारही केला. झोपडीधारकांच्या हल्ल्यात पालिकेचे पाच अभियंते, पाच मजूर आणि १५ पोलिस जखमी झाले असून, कायद्यानुसार झोपड्यांवरील कारवाई यापुढेही सुरू ठेवण्यात येईल, असे पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सांगितले.  

पवईच्या जयभीमनगर भागातील अतिक्रमण हटवण्याची नोटीस महापालिकेने संबंधित बांधकामधारकांना ३ जून रोजी दिली होती. परंतु, बांधकामे हटविण्यात न आल्याने पालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पथक पोलिस फौजफाट्यासह कारवाईसाठी दुपारी १च्या सुमारास जयभीमनगर येथे पोहोचले. त्यांना पाहताच तेथील रहिवाशांनी दगडफेक सुरू केली. पोलिसांनी जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला; परंतु जमावाने दगडफेक सुरूच ठेवल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. या घटनेचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एका व्हिडिओत स्थानिक रहिवाशांचा जमाव हाती झेंडे घेऊन उभा असल्याचे दिसते. 

२०० जणांवर गुन्हा दाखलसार्वजनिक सेवकांच्या कर्तव्यात अडथळा आणल्याबद्दल आणि पालिका पथकावर दगडफेक केल्याप्रकरणी पवई पोलिसांनी २०० अज्ञातांविरुद्ध आयपीसी कलम ३२४ नुसार (धोकादायक शस्त्रे किंवा साधनांनी दुखापत करणे) गुन्हा दाखल केला आहे.

सौम्य लाठीमारदुसऱ्या एका व्हिडिओत संतप्त जमावातील अनेक जण पोलिसांवर दगडफेक करीत असल्याचे आणि तिसऱ्या व्हिडिओत पालिका अधिकारी दगडफेकीपासून बचाव करण्यासाठी मागे सरकत असल्याचे दिसते. पोलिसांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो अनियंत्रित होत असल्याचे दिसताच त्यांनी सौम्य लाठीमार केला, असे या घटनेच्या व्हिडिओवरून स्पष्ट होते. 

हल्ले सहन करणार नाही : आयुक्त पालिकेच्या पथकावरील हल्ल्याची पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी गंभीर दखल घेतली असून, असे हल्ले कदापि सहन केले जाणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला आहे. हल्ल्यात जखमी झालेले पालिका कर्मचारी आणि पोलिसांची गगराणी यांनी भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. प्रशासन कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, असा विश्वासही त्यांनी जखमी कर्मचाऱ्यांना दिला. 

टॅग्स :मुंबई महानगरपालिकामुंबई