मुंबई- विधान परिषदेच्या निकालानंतर राज्यात मोठी घडामोड घडली आहे. मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात सापडलं आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार असल्याचा दावा करण्यात येत आहे.
सध्या सुरु असलेल्या राजकीय नाट्यानंतर शिवसेनेकडून विविध बैठकींचे आयोजन करण्यात येत आहे. शिवसेनेकडून आज सायंकाळी ५ वाजता सर्व आमदारांची बैठक बोलवण्यात आली आहे. त्याबाबत विधिमंडळ पक्षाचे मुख्य प्रतोद सुनिल प्रभू यांनी सर्वांना व्हीप जारी केला आहे. त्यामुळे या बैठकीत शिवसेनेचे नेमके किती आमदार उपस्थित राहतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र याआधी एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
राज्यातील राजकीय भूकंपावर अजित पवारांनी सोडलं मौन; अवघ्या दोन शब्दात दिली प्रतिक्रिया
शिवसेनेच्या खासदारांची नुकतीच एक बैठक पार पडली असून या बैठकीत एकूण १८ खासदारांपैकी १५ खासदार उपस्थित होते. तर ३ खासदारांनी या बैठकीत दांडी मारली. भावना गवळी, प्रताप जाधव, राजेंद्र गावित हे खासदार बैठकीत गैहजर राहिले. त्यामुळे सदर खासदार बैठकीला गैहजर राहण्याचं नेमकं कारण काय, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
दरम्यान, हिंदुत्व आमच्यासाठी महत्वाचं आहे. माझ्यासोबत असलेले आमदार हिंदुत्वाशी एकनिष्ठ आहेत. सत्ता प्राप्त करण्यासाठी हिंदुत्वाशी तडजोड कधीच करणार नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच आमच्यासोबत ४६ आमदार आहेत. या शिवसेनेसह इतरही आमदार आहेत. हा आकडा अजून वाढणार आहे. आमच्या कुठल्याही अटी नाहीत, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
उद्धव ठाकरेंना नेता मानता का?
पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या हिंदुत्वावर पुढे जाणार असल्याची भूमिका मांडली. याच वेळी त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला. "बाळासाहेब हे तुमचे नेते आहेतच, पण उद्धव ठाकरे यांना तुम्ही अजूनही तुमचे नेते मानता का?", यावेळी ते काय उत्तर देतात याकडे साऱ्यांचे लक्ष होते, पण त्याच वेळी संपर्क तुटला. त्यानंतर फोन कट झाला की केला, अशी चर्चा रंगल्याचे दिसत आहे.