मुंबई: उरण खाडी, कारंजा खाडी, धरमतर खाडी, अलिबाग खाडी, राजापुरी खाडी, दिवेआगर खाडी, कुंडलिका खाडी आणि सावित्री खाडी या खाड्यांचे सर्वेक्षण करण्यात आले असून, या सर्वेक्षणादरम्यान सदर प्रदेशातून खारफुटीच्या १५ प्रजातींची नोंद करण्यात आली. तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातर्फे सौरभ चंदनकर, गणेश पवार आणि डॉ. अजित टेळवे यांच्या टीमने सदर सर्वेक्षण केले.
महाराष्ट्रवनविभागाच्या कांदळवन प्रतिष्ठानने बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाला (टीसी कॉलेज) रायगड जिल्ह्यातील प्रमुख खाड्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी तसेच या प्रदेशातील विविध खारफुटीच्या प्रजातींचे अस्तित्व आणि प्रसार समजून घेण्यासाठी संशोधन प्रकल्प मंजूर केला होता.
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या संशोधकांनी २०२० च्या मध्यात काम सुरू केले परंतु कोविड लॉकडाऊनशी संबंधित विलंबामुळे सदर प्रकल्प सरतेशेवटी मे २०२२ मध्ये पूर्ण झाला. सर्वेक्षणादरम्यान नोंदवलेल्या सामान्य प्रजातींमध्ये Avicennia marina, Aegiceras corniculatum, Sonneratia apetala या व्यतिरिक्त, इतर महत्त्वाच्या खारफुटीच्या प्रजाती ज्या तुलनेने दुर्मिळ आहेत जसे की Bruguiera cylindrica, Bruguiera gymnorrhiza, Xylocarpus granatum आणि Cynometra iripa यांचीही काही भागात नोंद करण्यात आली. या सर्वेक्षणादरम्यान असे आढळून आले की, रेवदंडा आणि आगरदांडा येथे खारफुटीच्या सर्वाधिक प्रजाती (११) आढळल्या, त्यानंतर कुरूळ, भालगाव आणि वाशी-हवेली येथे खारफुटीच्या १० प्रजाती आढळून आल्या.
वीरेंद्र तिवारी, अपर प्रधान मुख्य वन संरक्षक, कांदळवन कक्ष यांनी अशी माहिती दिली की , ‘ या अभ्यासाच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील खारफुटीची विविधता आणि दुर्मिळ प्रजाती असलेल्या काही क्षेत्रांची माहिती मिळाली आहे. तसेच अहवालात खारफुटीच्या काही भागांवर काही मानवनिर्मित हस्तक्षेपांवरही प्रकाश टाकण्यात आला आहे. या अभ्यासात खारफुटीच्या लागवडीची संभाव्य ठिकाणे देखील दर्शविली गेली आहेत ज्यांची वन विभागाकडून पडताळणी केली जाईल.