१५ टेक्निशियनची पदे रिक्त
By admin | Published: May 26, 2014 03:54 AM2014-05-26T03:54:19+5:302014-05-26T03:54:19+5:30
मुंबई सेंट्रल येथील महापालिकेच्या नायर रुग्णालयातील एक्स रे विभागामध्ये एकूण १५ टेक्निशियन्सच्या जागा रिक्त आहेत.
पूजा दामले, मुंबई - मुंबई सेंट्रल येथील महापालिकेच्या नायर रुग्णालयातील एक्स रे विभागामध्ये एकूण १५ टेक्निशियन्सच्या जागा रिक्त आहेत. फक्त १० टेक्निशियन एक्स रे विभाग सांभाळत आहेत. नायर रुग्णालयाचा एक्स रे विभाग हा २४ तास सुरू असतो. रुग्णालयामध्ये एकूण चार एक्स रे मशीन असून, त्यातील एक मशीन अत्याधुनिक एक्स रे मशीन आहे. एक एक्सरे मशीन सांभाळण्यासाठी दोन टेक्निशियनची गरज असते. मात्र सध्या टेक्निशियनची कमतरता असल्यामुळे एकाच टेक्निशियनला एक मशीन सांभाळावे लागत आहे. आठ तास एकच टेक्निशियन हे काम बघत असल्यामुळे कामाचा ताण आहे. एका दिवसामध्ये सुमारे ६०० ते ८०० एक्स रे काढले जातात. १० जणांमध्ये काम करताना खूप ताण येतो. रुग्णांचा ओघ जास्त असल्यामुळे सर्व मशिन्स चालू ठेवावी लागतात. टेक्निशियनसाठी शैक्षणिक पात्रता ही १२वी पास आहे. मात्र काही टेक्निशियन्स हे १०वी पास आहेत. मात्र त्यांचा अनुभव हा ८ ते १० वर्षे इतका आहे. सर्व काम त्यांना येते. तरीही या रिक्त पदांवर त्यांना घेतले जात नाही, असे येथील कर्मचार्यांचे म्हणणे आहे. नायर रुग्णालयामध्ये टेक्निशियन्स कमी आहेत. काही अटींची पूर्तता होत नसल्यामुळे या जागा भरल्या गेल्या नाहीत. नायर रुग्णालयासाठी एक अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. टेक्निशियन्सना प्रशिक्षण देऊन त्यांची परीक्षा घेऊन या जागा भरल्या जातील. यामुळे पुढच्या काही दिवसांतच या जागा भरल्या जातील, असे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले.