मुंबई - मुंबईत गेल्या २४ तासात ७८८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मात्र कोरोना आकडेवारीतील चढ-उतार अद्याप सुरूच आहे. मृतांची संख्या दिवसभरात पुन्हा वाढली आहे. मुंबईत बुधवारी २७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सोमवारीही २७ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली होती. काल मुंबईत हीच संख्या केवळ सात इतकी नोंदविण्यात आली होती. मुंबईत सध्या १५ हजार ९४७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
मुंबईतील बाधित रुग्णांचा विचार केला असता, मुंबईत बुधवारी २९ हजार ८२ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यातील ७८८ कोरोना चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. मुंबईत आतापर्यंत नोंद करण्यात आलेल्या बाधित रुग्णांची संख्या ही ७ लाख १३ हजार ७९० इतकी झाली आहे. मुंबईचा दैनंदिन मृत्यूदर हा २.११ टक्के आहे.
मुंबईत दिवसभरात केवळ ५११ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर मुंबईत आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ही ६ लाख ८० हजार ५२० इतकी आहे. त्याचप्रमाणे मुंबईतील सक्रिय कंटेन्मेंटची संख्या २८ वर आली आहे, तर ६२ सक्रिय सीलबंद इमारती आहेत.
१०५२ रुग्ण गंभीर अवस्थेत
पालिकेच्या डॅशबोर्डवरील माहितीनुसार, मुंबईतील सक्रिय रुग्णांपैकी १०५२ रुग्ण गंभीर अवस्थेत असून, विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर ८ हजार ९७५ लक्षणविरहित रुग्ण आहेत. याखेरीज ५ हजार ६७४ मध्यम व सौम्य लक्षणे असलेले रुग्ण आहेत.