पालिका कर्मचाऱ्यांना १५ हजार सानुग्रह अनुदान
By admin | Published: November 4, 2015 11:32 PM2015-11-04T23:32:00+5:302015-11-04T23:32:00+5:30
महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान मंजूर करण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. कायम कामगारांना १५ हजार रूपये तर ठोक मानधनावरील
नवी मुंबई : महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान मंजूर करण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. कायम कामगारांना १५ हजार रूपये तर ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना ८ हजार रूपये अनुदान मंजूर केले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना स्थायी समितीने १४६०० रूपये व ठोक मानधनावरील कामगारांना ६३०० रूपये सानुग्रह अनुदान मंजूर केले होते. या प्रस्तावास महासभेची मंजुरी घेण्यासाठी बुधवारी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. सभा उशिरा सुरू झाल्याबद्दल विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी नाराजी व्यक्त केली. कायम कामगारांना २० हजार रूपये सानुग्रह अनुदान देण्याची मागणी केली. महापौरांनी सर्वांचे मनोगत ऐकून घेवून कायम कामगारांना १५ हजार रूपये व ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना ८ हजार रूपये मंजूर केले आहेत.
प्रशासनाने निश्चित केलेल्या रकमेमध्ये स्थायी समितीने अनुक्रमे ६०० व ४०० रूपयांची वाढ केली होती. सर्वसाधारण सभेने कायम कामगारांच्या रकमेमध्ये ४०० व ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या रकमेमध्ये १७०० रूपये वाढ केली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. (प्रतिनिधी)
तिजोरीवर ४ कोटींचा भुर्दंड
एलबीटी रद्द केल्यामुळे नवी मुंबई महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत बंद झाला आहे. पालिका आर्थिक अडचणीमध्ये असल्यामुळे विकास कामांवरही परिणाम होवू लागला आहे. त्यामध्ये कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानासाठी तिजोरीवर जवळपास ४ कोटींचा भुर्दंड पडणार आहे.