Join us

भुयारी मेट्रोतून १५ हजार मुंबईकरांचा प्रवास; पहिल्याच दिवशी झाली झोकात सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2024 5:29 AM

बीकेसी ते आरे प्रवासाचा घेतला आनंद 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईकरांना तसे मेट्रोचे अप्रूप नाही. मात्र, मुंबईच्या पोटातून अर्थात जमिनीखालून जाणाऱ्या मेट्रो-३ची मुंबईकरांना उत्कंठा होती. सोमवारी या भुयारी मेट्रोतून जाण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यास मुंबईकर सज्ज झाले. मेट्रो-३नेही मुंबईकरांचे मन:पूर्वक स्वागत केले. पहिल्या दिवशी १५ हजार ७१३ मुंबईकरांनी बीकेसी ते आरे या प्रवासमार्गाचा आनंद लुटला. 

मेट्रो-३चा पहिला टप्पा सोमवारी सकाळी ११ पासून प्रवाशांसाठी खुला झाला. सकाळच्या सत्रात फारशी गर्दी नव्हती. मात्र, सायंकाळी अनेकांनी भुयारी मेट्रो प्रवासाचा पर्याय निवडला. 

कॉलेजमधील अंतर्गत परीक्षेचा पेपर देऊन आम्ही नऊजण मेट्रोतून प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी आलो होतो. सीप्झ ते बीकेसी असा आम्ही प्रवास केला. या प्रवासाचा पहिला अनुभव मस्त होता. - विकी शिंदे, विद्यार्थी

गेल्या आठ वर्षांपासून मेट्रो मार्गिकेचे सुरू असलेले काम पाहत होतो. त्यातून या मेट्रोतून प्रवास करण्याचे कुतूहल होते. मेट्रोचा प्रवास अतिशय थंडगार आहे. मजा आली.  - मोहम्मद अन्सारी, ज्येष्ठ नागरिक

मुलीला विलेपार्ले येथून मरोळ नाका येथे शाळेत सोडण्यासाठी दररोज कारने जाते. मुलीला शाळेत सोडून परत घरी जाताना एक तास लागतो. मात्र मेट्रो प्रवास अवघ्या अर्ध्या तासात झाला. तसेच वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले नाही. मात्र विलेपार्ले स्थानकापासून द्रुतगती मार्गापर्यंत येण्यासाठी काही अंतर चालावे लागते. स्थानकाशेजारी बेस्ट बस आणि रिक्षाची सुविधा झाल्यास स्थानकात उतरून घरापर्यंतचा प्रवास आणखी सोपा होईल.  - नीता सावंत, गृहिणी

मेट्रोचे वेळापत्रक 

सोमवार ते शनिवार

- पहिली गाडी सकाळी ६.३० वाजता सुटेल.- शेवटची गाडी रात्री १०.३० वाजता सुटेल.

रविवारी : पहिली मेट्रो सकाळी ८.३० वाजता सुटेल.

- शेवटची गाडी रात्री १०.३० वाजता सुटेल.

 

टॅग्स :मेट्रो